मधुरा परब मृत्यूप्रकरणी तिच्या सासूला दोन दिवसात अटक करा…

285
2

इन्सुली ग्रामस्थांची जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांकडे मागणी;अन्यथा आंदोलन…

ओरोस ता.२१: सौ.मधुरा उर्फ शीतल मिलिंद परब हिच्या मृत्यु प्रकरणातील सर्व आरोपींना कडक शासन करा,या मृत्यु प्रकरणात खरी सूत्रधार असलेल्या तिच्या सासूला दोन दिवसात अटक करा.अन्यथा इन्सुली व कुणकेरी ग्रामस्थ सावंतवाडी पोलिस ठाण्यात मोर्चा काढतील,असा इशारा इन्सुली येथील तिच्या माहेर वासियांकडून देण्यात आला आहे.याबाबत त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे व जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना दिले आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय राणे, ग्राम पंचायत सदस्य महेश धुरी, दीपेश गावडे, महेंद्र सावंत, तुकाराम गावडे आदी उपस्थित होते.
या निवेदनात 15 डिसेंबर रोजी कुणकेरी येथे मधुरा उर्फ शीतल मिलिंद परब यांची झालेली आत्महत्या ही आत्महत्या नसुन तिचे पती मिलिंद, त्यांची आई, वडील व भाऊ या चौघा जणांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून निर्घृण हत्या केल्याचे आमचे म्हणणे आहे. मिलिंद यांचा मोठा भाऊ बंड्या यांची पत्नी या सर्व मंडळींच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कुठे गेली ? तिचे काय झाले ? हे संशयास्पद आहे. तसेच या सर्व प्रकारणांचा खरा सूत्रधार मिलिंद यांची आई आहे. त्यामुळे तिला ताबडतोप अटक करा. या सर्वांची योग्यती चौकशी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. तसेच मधुरा हिचा तीन महिन्यांचा मुलगा आहे. त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी पती मिलिंद यांनी घ्यावी. त्याला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास या सर्व मंडळीना जबाबदार धरण्यात यावे, असे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करून मिलिंद यांच्या आईला दोन दिवसात अटक करण्यात यावी. अन्यथा इन्सुली व कुणकेरी ग्रामस्थ सावंतवाडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढतील, असा इशारा देण्यात आला आहे.

4