पैशासाठीच पर्यटन व्यावसायिकांवर कारवाई…

287
2
Google search engine
Google search engine

वैभव नाईक यांचा  आरोप ; प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना धरले धारेवर…

मालवण, ता. २१ : ऐन पर्यटन हंगामात पर्यटन व्यावसायिकांविरोधात बंदर विभागाकडून केली जात असलेली कारवाई ही पैशासाठीच असल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. गेल्यावर्षी मे महिन्यात पर्यटन व्यावसायिकांकडून लाखो रुपये घेतल्याची यादी माझ्याकडे आहे. संबंधितांना समोर आणू काय? तुमच्यासाठी पैसे बंदर निरीक्षक घेत असल्याचे सांगत त्यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांना चांगलेच धारेवर धरले.
मालवण येथील स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांवर बंदर विभागाने कारवाई करत अनधिकृतरीत्या वापरले जात असलेले सिलिंडर जप्त करण्याची कारवाई केली. याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी येथील बंदर कार्यालयावर धडक दिली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, दिलीप घारे, लारा देसाई, सन्मेश परब, राजू मेस्त्री, तपस्वी मयेकर, प्रवीण रेवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पर्यटन हंगामात कारवाईचा बडगा उगारणारा बंदर विभाग इतरवेळी गप्प का असतो? आतापर्यंत किती व्यावसायिकांनी प्रस्ताव सादर केले? किती जणांना बंदर विभागाने परवानगी दिली? परवानगी देण्यास विलंब का होत आहे? असा प्रश्‍नांचा भडिमार आमदार नाईक यांनी यावेळी केला. व्यवसाय हा नियमातच असायला हवा अशी आमची भूमिका आहे. मात्र पैसे घेण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये असे आमदार नाईक यांनी सांगितले. येथील समुद्रातील खडकाळ भागात मासेमारीस जाणार्‍या नौकांना दिशा समजावी यासाठी दिशादर्शक बोया बसविण्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला. मात्र बंदर विभागाने अद्यापपर्यंत दिशादर्शक बोया बसविण्याची कार्यवाही केलेली नाही. परिणामी दोन महिन्यांपूर्वी एका मच्छीमाराची नौका खडकावर आदळून सुमारे १२ लाखाहून अधिक नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई कोण देणार? असा प्रश्‍न आमदार नाईक यांनी केला. नौकांचे असेच अपघात होण्याची बंदर विभाग वाट बघत आहे का? असा प्रश्‍न हरी खोबरेकर यांनी केला. यावर याबाबत सागरी अभियंत्यांना कळविले असल्याचे बंदर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
मालवण बंदर विभागाचा कारभार मोठा असून अनेक अधिकारी येथे आहेत. मात्र आज प्रथमच बंदर निरीक्षक वर्दीत असल्याचे आपल्याला दिसले असा टोला आमदार नाईक यांनी लगावला. बंदर विभागाला आवश्यक सहकार्य करण्यास आपण तयार आहोत. मात्र कोणताही हेतू ठेवून येथील व्यावसायिकांवर कारवाई होता नये असे त्यांनी सांगितले. येथील किनारपट्टी भागात वॉटरस्पोर्टस् तसेच अन्य पर्यटन व्यावसायिकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यावर परवानगी मिळावी. स्कूबा व्यवसायाबाबत धोरण निश्‍चित करावे. कारवाईत नियमितता असावी. पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या दूर व्हाव्यात. यासाठी राज्याचे गृह व बंदरविकास मंत्री यांच्यासमवेत पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल असे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.