तालुक्यात सर्वत्र शांतता राखा ; पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांचे आवाहन…
मालवण, ता. २१ : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर येथील बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत नागरिकांना काही शंका असल्यास त्यांनी आपल्याशी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी शांतता, मोहल्ला कमिटीच्या बैठकीत केले.
मालवण पोलिस ठाण्यात आज शांतता, मोहल्ला कमिटीची बैठक झाली. यावेळी पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, गोपनीय विभागाचे कर्मचारी प्रसाद आचरेकर, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, वासुदेव गावकर, पांडुरंग चव्हाण, समीर पटेल, कैसर पठाण, जॉन नर्होंना, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, लिलाधर सारंग यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
सध्या देशात नागरिकत्व विधेयकावरून जी आंदोलने होत आहेत याची माहिती देत शहर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी नागरिकांनी घ्यावी. मालवणात सर्व समाजाचे बांधव आहेत. त्यामुळे काही अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास संबंधित नागरिकांनी आपल्याशी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून याची माहिती द्यावी. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी असे सांगितले. यावेळी शहरातील हिंदू-मुस्लिम बांधव गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे गरज भासल्यास मुस्लिम बांधवांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असे नागरिकांनी स्पष्ट केले.