जास्त प्रमाणात रासायनिक फवारणी मानवी जीवनास धोकादायक

133
2

प्रसाद ओगले; वैभववाडी येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न

वैभववाडी.ता,२२:  शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी झाडांवर जास्त प्रमाणात रासायनिक कीटकनाशके व औषधांची फवारणी करत आहेत. याचा परिणाम झाडांपासून मिळणाऱ्या उत्पादनामुळे मानवी जीवनावर याचा दुष्परिणाम होऊन हृदयरोग व मधुमेह यासारख्या रोगांचे प्रमाण वाढले आहे .अशी भीती कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद ओगले यांनी व्यक्त केली.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वैभववाडी तालुका आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयान, जि. प. सदस्या शारदा कांबळे , जि. प .सदस्य सुधीर नकाशे, माजी जि .प. उपाध्यक्ष नासिर काझी, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, तालुका कृषी अधिकारी श्री. आगवान,आत्मा समितीचे अध्यक्ष महेश रावराणे, कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राध्यापक विवेक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ओगले म्हणाले, सध्या शेतकरी स्ट्रॉंग औषधांचा उपयोग करून झाडांवर फवारणी करत आहे. याचा परिणाम झाडांवर होतो त्याच बरोबर मानवाच्या जीवनावरही दुष्परिणाम होत आहे. फवारणी करतेवेळी कामगाराने मास्क व हॅन्ड ग्लोज चा वापर करावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्याने निसर्ग साखळीचे संवर्धन करावे. अति औषधांचा वापर करू नये. कमीत कमी औषधांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले पाहिजे. आंबा पीक हवामानावर अवलंबून असते. ज्यावेळेस ढगाळ वातावरण असते त्यावेळी आंबा व काजू पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होतो.
रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी औषधे व कीटकनाशके कमी मात्रा वापरावित. अतिरिक्त वापर केला तर आपल्याला पिकाचा चांगला रिझल्ट मिळेल असा शेतकऱ्यांचा समज असतो. मात्र असे करणे हे शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. जास्त फवारणी केल्यास सर्व कीटकनाशके मरतील असे नाही. शेतकऱ्यांना कमीत कमी औषधे व कीटकनाशके मारून जास्तीत जास्त उत्पादन घेणे आवश्यक आहे. झाडांचे आरोग्य चांगले असेल तर ते झाड शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देऊ शकते. यासाठी चांगले वातावरण असावे लागते. झाडांना सुक्ष्म मूलद्रव्य मिळणे गरजेचे असते. तसेच नैसर्गिक साखळीमध्ये समानता राखणे गरजेचे असते.
आंबा झाडावर ५ ते ६ फवारण्या करणे आवश्यक असते. फवारणीमध्ये १५ ते २० दिवसांचे अंतर असावे लागते. या फवारण्यासाठी डेल्टामेथ्रीन इसी चा वापर करावा. तसेच डायमेथोएट, लॅमेडा सायक्लोथ्रीन, या बुरशीनाशक तसेच गोमूत्र, तुरटी, तुळसी व घटपर्णी इत्यादींचे मिश्रण करून झाडावर फवारणी करावी. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खते वापरून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे.
पूढे प्रा. विवेक कदम म्हणाले, शेतकऱ्यांनी नेहमी शेतात जाऊन शेतीची पाहणी करावी. कीड लागलेल्या झाडातील कीड काढून टाकावा. ऑटोबर ते मार्च या काळात काजू झाडांवर लक्ष ठेवावे. या काळात रोग असेल तर आवश्यक फवारणी करावी. शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टीकोन ठेवावा तरच आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, आत्मा समिती अध्यक्ष महेश रावराणे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, कृषी मित्र पवार, मंगेश कदम, इंद्रजित परबते, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कृषी सहायक विवेकानंद नाईक यांनी मानले.

4