बांद्याचा ८४ लाखाचा विकास आराखडा मंजूर

2

ग्रामसभेत मंजुरी;चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा निर्णय…

बांदा.ता,२२:  १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत आज बांदा शहराचा ८४ लाख रुपयांचा विकास आराखडा ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. यावेळी शहरातील विकासकामांबरोबरच सर्वाधिक निधीची तरतूद ही शिक्षण व आरोग्यासाठी करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. १४ व्या वित्त आयोगातील अखर्चित निधीही खर्ची करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तब्बल ५ तास ग्रामसभा चालली.
येथील ग्रामपंचायत सभागृहात सरपंच अक्रम खान यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, जावेद खतीब, किशोरी बांदेकर, श्यामसुंदर मांजरेकर, समीक्षा सावंत, अंकिता देसाई, स्वप्नाली पवार, तलाठी वर्षा नाडकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम १४ व्या वित्त आयोगातील अखर्चित निधी किती शिल्लक आहे याची माहिती देण्याची मागणी अन्वर खान यांनी केली. त्यापैकी ५८ लाख ५२ हजार ६४६ रुपये शिल्लक असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी डी. एस. अमृतसागर यांनी दिली. चौदाव्या वित्त आयोगातील जी कामे प्रलंबित आहेत ती कामे प्राधान्याने १५ व्या वित्त आयोगात घ्यावी असा ठराव घेण्यात आला. १४ व्या वित्त आयोगात एकूण ६७० कामे पूर्ण केल्याची माहिती सरपंच खान यांनी दिली. पूर्ण बांदा शहराचा विचार करता सर्व प्रभागांना समान न्याय द्यावा अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांनी केली.
शिक्षण, आरोग्य व उपजीविकेसाठी २५ लाख रुपये तरतूद करण्यात आले आहेत. त्यापैकी १० लाख रुपये आरोग्यासाठी तरतूद आहेत. बांदा उपकेंद्रासाठी छप्पर दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी ३ लाख तरतूद आहेत, मात्र सदरची इमारत जीर्ण झाली असून ही इमारत निर्लेखित करावी अशी मागणी गजानन गायतोंडे व तुळशीदास धामापूरकर यांनी केली. नागरी सुविधा अंतर्गत लाखोंचा निधी प्राप्त झाला असून त्या माध्यमातून शहरात विकासकामे सुरू असल्याची माहिती सरपंच खान यांनी दिली. यावेळी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. विकास आराखड्यात अनेक कामांची तरतूद करण्यात आली.

4