वेंगुर्ला.ता.२२: वेंगुर्ला येथील जागृती क्रीडा-सांस्कृतिक मंडळातर्फे दि. ४ व ५ जानेवारी २०२० या कालावधीत श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी येथे ‘जागृती फेस्टीव्हल २०२०‘चे आयोजन करण्यात आले आहे.
जागृती फेस्टीव्हलचे हे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. शनिवार दि.४ जानेवारी रोजी श्री. सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे सायं. ६ वा. बालवाडी, ७ वा. पहिली ते दुसरी, सायं. ७.३० वा. तिसरी ते चौथी व रात्रौ ८ वा. पाचवी ते नववी या गटांमध्ये तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धा होणार आहे.
रविवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. कॅम्प मैदानावर बालवाडी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी ते दहावीमधील मुलामुलींसाठी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. याच दिवशी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय बालकुमार चित्रकला स्पर्धा होणार आहे. बालवाडीसाठी-फुल, पहिली ते दुसरीसाठी पक्षी, तिसरी ते चौथीसाठी – निसर्गचित्र, पाचवी ते सातवीसाठी – स्वच्छता मोहिम व नववी ते दहावीसाठी – राष्ट्रीय एकात्मता असे विषय ठेवण्यात आले आहेत. बालवाडी आणि पहिली ते दुसरी गटांनी तेलखडू किवा स्केचपेन तसेच इतर गटांनी जलरंग वापरावयाचे आहेत. मंडळातर्फे फक्त ड्राॅईंग पेपर पुरविण्यात येईल.
५ जानेवारी रोजी सायं. ६ वा. बालवाडी, सायं. ७ वा. पहिली ते दुसरी, रात्रौ ८ वा. पाचवी ते दहावी गटांसाठी तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटानुसार विजेत्या ५ क्रमांकांना रोख रक्कमेची बक्षिसे व कै.संजय रमाकांत मालवणकर स्मरणार्थ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. फेस्टीव्हल मधील प्रत्येक स्पर्धेसाठी १० रुपये एवढी प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज शाळेमार्फत प्रवेश फीसह २ जानेवारी २०२० पर्यंत श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी-वेंगुर्ला येथे आणून द्यावयाचे आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. तरी जागृती फेस्टीव्हलमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जागृती क्रीडा-सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल मालवणकर, सांस्कृतिक विभागप्रमुख विवेक राणे व दिलीप मालवणकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विठ्ठल मालवणकर (९८९०४११२७०, ९३०७४३८४५०) यांच्याशी संपर्क साधावा.