राजन तेलींचा आरोप; नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपाचा एक हाती विजय
सावंतवाडी ता.२३: विधानसभा निवडणूकी दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युवकांना नोकरी देण्यासंदर्भात खोटी पत्रे दिली.तसेच सेट-टॉप-बॉक्स देण्याची खोटी आश्वासने दाखवून आपली पोळी भाजून घेतली,असे येथील मतदारांचे म्हणणे आहे.नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा रोष जनतेतून व्यक्त होत आहे.असा आरोप माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे केला.याठिकाणी संजू परब यांचा शिस्तबद्ध प्रचार सुरू आहे.जनतेकडून सुद्धा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पक्ष एक हाती नक्कीच जिंकेल,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संजू परब यांच्या प्रचारादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजू परब,माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर,मधुसूदन बांदिवडेकर,सभापती पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते.
श्री.परब पुढे म्हणाले,नुकत्याच झालेल्या बांदा आणि आंब्रड येथील निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर मात करून एक हाती विजय मिळवला आहे .आणि आता सावंतवाडी नगराध्यक्षपद निवडणुकीत हॅट्रिक करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.आणि ती नक्कीच आम्ही यशस्वीरित्या साध्य करू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री केसरकर यांनी आजपर्यंत प्रत्येक निवडणूक दहशतवाद या मुद्द्यावर लढवली आहे. आणि याही निवडणुकीत ते तोच मुद्दा प्रकर्षाने मांडत आहेत.मात्र त्यांनी कोणतीही विकास कामे न केल्याने त्यांच्याकडे विकासाचे मुद्देच ऊरले नाही.सावंतवाडीत आजही काही भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. तेथील जनतेकडून मागण्या होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत.प्रचारादरम्यान याच व्यथा आम्ही जनतेकडून जाणून घेत आहोत.आणि निवडणुकीनंतर त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.येथील जनतेचा सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभेला आम्ही खोट्या आश्वासनांना बळी पडलो मात्र आता ती वेळ पुन्हा येऊ देणार नाही.असे मत मतदारांमधून व्यक्त होत आहे.त्यामुळे श्री.परब यांना येथील जनता पाच हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून देईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.