वाघेरी मठखुर्द ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीय पेयजल नळ योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार…

252
2

ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचा आरोप;जिल्हा परिषदे समोर छेडले उपोषण….

सिंधुदुर्गनगरी.ता,२३:
कणकवली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाघेरी मठखुर्द या ग्रामपंचायतीत 2015-16 च्या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गच्या नळ योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. त्याचप्रमाणे अन्य प्रकारचे बांधकाम, दलित वस्ती नळ योजना यामध्येही यामध्येही वारंवार भ्रष्टाचार होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद समोर एक दिवसाचे उपोषण छेडले.
राष्ट्रीय पेयजल अंतर्गत गावठणवाडी मळावाडी नळपाणी पुरवठा नूतनीकरणाचे काम करण्यात आले. 45 लाखांच्या अंदाजपत्रकिय तरतुदी पैकी 44 लाख 74 हजार 771 रुपये खर्च करण्यात आले. मात्र कामे अपूर्ण असतानाच हे पैसे खर्च पडल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. खोटे ठराव दाखविण्यात आले. कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या कामांच्या पाहणी दरम्यान त्यांना कोरी रजिस्टर मिळाली होती. यावर 39/1 नुसार गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते. मात्र नोटीस पलीकडे काहीही झालेले नाही.
या संपूर्ण कारभारात लाखोंची अफरातफर झाली आहे. त्यामुळे यांची चौकशी करून योग्य कारवाई संबंधितावर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या पत्रा कडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1997 ते 2004-05 या कालावधीत जवाहर रोजगार योजनेअंतर्गतच्या कामांमध्ये तब्बल सहा लाख 57 हजार आठशे तेरा रुपयांचा अफहार झाला असल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले असल्याचे उपोषणकर्त्यांना मान्य आहे. तसेच दलित वस्तीच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व कामांची चौकशी करावी या मागणीसाठी उपोषण असल्याचे उपोषण कर्त्यांकडून सांगण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघेरकर, मंगेश नेवगे, तुकाराम गुरव अनुजा राणे यांच्यासह सिद्धेश रणे मुरलीधर राणे दत्तात्रय राणे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

4