देवगड येथील घटना; आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता…
ओरोस ता २३:
देवगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपींची संख्या वाढली असून राजेंद्र साटम आणि विशाल पुजारे यांच्यापाठोपाठ येथील महेश आडगावकर 27 आणि देवगड येथील स्वप्निल साटम 32 या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
मोबाईल दुरुस्ती साठी 12 डिसेंबर रोजी घरातून निघालेल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी राजेंद्र साटम आणि विशाल पुजारी यांना अटक केली होती. सिंधुदुर्गनगरी येथील विशेष न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ते पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी करून पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधले होते. पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेत हा तपास आता निवासी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती संध्या गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे .
या टीमने या तपासाची सूत्रे हाती घेत या प्रकरणात अन्य साथीदारांचा समावेश असल्याचे उघड करत आणखी दोन संशयित आरोपी ताब्यात घेतले. त्यांना सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील विशेष न्यायाधीश एच डी जगमलानी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.