- ५० एकर शेतजमीन बाधित ः खारबंधार्याची झडपे तुटली
आचरा, ता.23 ः आचरा गावातील गाऊडवाडी, काझीवाडा, भंडारवाडा तसेच डोंगरेवाडी भागात खारेपाणी घुसल्याने सुमारे 50 एकर शेतजमीन बाधित झाली आहे. खार बंधार्याची झडपे तुटून पडल्याने हे खारेपाणी आल्याने शेतजमीन नापिक झाली आहे. तसेच माडबागायतीलाही खार्यापाण्याचा फटका आहे. याखेरीज येथील विहिरींचेही पाणी दूषित झाले आहे. खारभुमी व विकास कणकवली विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
आचरा गाऊडवाडी, काझावाडा, भंडारवाडा व डोंगरेवाडी भागातील खाजनसदृश भागाचा खार बंधारा सुस्थितीत आहे. मात्र यावर बसवलेली झडपे मोडून पडल्याने खाडीचे भरतीच्या वेळचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात शेतजमीनीत साठून राहिले आहे. त्यामुळे भातशेतीवरही ग्रामस्थांना पाणी सोडावे लागले आहे. जवळ जवळ 200 ते 300 माडबागायती खार्या पाण्यामुळे नष्ट झाली आहे. उर्वरित माडबागायतही धोक्यात असून विहिरींचे पाणीही दूषित होण्याच्या मार्गावर आहे.