ओरोस, ता.२३: विवाहितेस घरात घुसून, अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून नेल्याप्रकरणी वेतोरे (वेंगुर्ले) येथील मिलींद गोविंद नाईक, काळू नाईक, गोविंद नाईक, सचिन नाईक यांना जिल्हा न्यायाधीश क्र. 2 आर. बी. रोटे यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
29 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6 वा.च्या सुमारास बचत गटाच्या कर्जाऊ रक्कमेची मुदतीत परतफेड केली नाही, तसेच गटाच्या बैठकांना हजरही राहत नसल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिला सदस्यांच्या पती व नातेवाइकांनी फिर्यादीला तिच्या घरात घुसून घरावर लाथा मारून अश्लील शिवीगाळ करून तिच्या गळ्यातील मंगळसुत्र आरोपी मिलींद नाईक याने तोडून नेले. म्हणून वेंगुर्ले पोलिसांत 1 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींविरूद्ध भादंवि कलम 327, 323, 504, 509 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आपणास अटकपूर्व जामिन मंजूर व्हावा म्हणून आरोपींनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत फिर्यादीने दिलेली तक्रारच मुळात तिच्या पतीविरुद्ध बचत गटाची अध्यक्ष मयुरी नाईक हिने दिलेल्या तक्रारीनंतर मागाहून विचारपूर्वक उशिराने दाखल करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच फिर्यादीचा पती कथित घटनेनंतर 29 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 10 वा. वेंगुर्ले पोलिसांत येऊनही त्याने घटनेबाबत फिर्याद दिली नव्हती. तसेच दि. 30 नोव्हेंबर रोजी फिर्यादीच्या पतीविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीबाबत त्याला अटकेची नोटीस देण्यासाठी पोलिस फिर्यादीच्या घरी गेले होते, त्यावेळीही घटनेबाबत कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती. मंगळसुत्राचे वर्णनही देण्यात आलेले नव्हते. फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केलेली घटनेची वेळ आणि फिर्यादीत नमूद वेळ यात चार तासांचा फरक होता. यावरून बचत गटातील वादातून राजकीय हेतूने फिर्यादीने हेतुपुरस्सर खोडसाळ तक्रार दाखल केल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला.