आरोग्याच्या दृष्टीने चांगली सेवा देणार आरोग्य सभापती पंकज सादये…
मालवण, ता. २३ : मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नव्याने खरेदी केलेल्या सक्शन गाडीचे लोकार्पण आरोग्य सभापती पंकज सादये यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपरिषदेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या जास्त क्षमतेच्या या संक्शन गाडीमुळे शहरातील शौचालयांचा मैला उपसा करणे सुलभ होणार आहे. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांना चांगली सेवा देण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न असल्याचे आरोग्य सभापती पंकज सादये, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे यापूर्वी असलेली सक्शन गाडी जुनी झाल्याने आरटीओ विभागाने ही गाडी निर्लेखित केली होती. या गाडीला मुदतवाढ मिळावी म्हणून नगरपरिषदेने केलेली मागणी आरटीओने नाकारली होती. त्यानंतर ७ नोव्हेंबरला नगरपरिषदेच्या स्थायी समिती सभेत नवीन सक्शन गाडी घेण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. नवीन सक्शन गाडी १४ व्या वित्त आयोगातून घेण्यात आली आहे. या गाडीची किंमत सुमारे २० लाख रुपये असून गाडीच्या टाकीची मैला साठवणूक क्षमता साडे चार हजार लिटर एवढी आहे. अशोक लेलॅण्ड कंपनीची ही गाडी ओझोन इन युरोटिक पुणे यांच्याकडून खरेदी केली आहे.
आरोग्य सभापती पंकज सादये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या गाडीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, यतीन खोत, आप्पा लुडबे, दीपक पाटकर, ममता वराडकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, शीला गिरकर, गणेश कुडाळकर, स्वच्छता मुकादम रमेश कोकरे, आरोग्य निरीक्षक विजय खरात, रसिका कुलकर्णी, दीपा शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.