मालवण पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा…

2

रिक्षेत राहिलेली महिला पर्यटकाची किंमती पर्स दिली मिळवून ; पर्यटकांकडून पोलिसांचे आभार…

मालवण, ता. २३ : रिक्षेत राहिलेली महिला पर्यटकाची किंमती साहित्य असलेली पर्स परत मिळवून देण्यात येथील पोलिसांना यश आले. सायंकाळी उशिरा संबंधित रिक्षा मालकाकडून ती पर्स महिला पर्यटकाच्या स्वाधीन करण्यात आली.
पनवेल येथील नेहा जाधव, पूजा कांबळे या मालवण बंदर जेटी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत कुटुंबीय होते. सायंकाळी त्या बंदर जेटी येथून एका रिक्षेतून चिवला बीच येथे गेल्या. मात्र घाईगडबडीत त्या रिक्षेच्या पाठीमागील भागात टाकलेली पर्स काढण्यास विसरल्या. काही वेळानंतर त्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता संबंधित रिक्षा ही हडी येथील असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे रिक्षामालक दिलावर शेख याच्याशी पोलिसांनी संपर्क साधत याची माहिती दिली.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, सुभाष शिवगण, विलास टेंबुलकर, महिला पोलिस कर्मचारी प्रवीणा आचरेकर यांनी हडी येथे त्या महिला पर्यटकांसोबत जात ती पर्स ताब्यात घेतली. रिक्षा मालकास रिक्षेतील पाठीमागील जागेत ठेवलेल्या या पर्सची कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळे त्याने पाहणी करत महिला पर्यटकांची पर्स त्यांच्या स्वाधीन केली. या पर्समध्ये तीन तोळे सोने व रोख १९ हजार रुपये होते. पर्स मिळून दिल्याबद्दल महिला पर्यटकांनी पोलिसांचे आभार मानले.

4