परिसरात भीतीचे वातावरण; वनविभागाकडून पंचनामा…
सावंतवाडी ता.२४: न्हावेली-भोमवाडी येथे ओहळातील पाणी पिण्यासाठी गेलेल्या दुभत्या म्हैशीवर दबा धरून बसलेल्या मगरीने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज उघडकीस आला.या म्हैशीवरच उदरनिर्वाह असलेले शेतकरी दिनेश हरमलकर यांनी यात आपले ३० ते ४० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगितले.दरम्यान अशा मगरींमुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्हावेलीत मगरींची दहशत अद्याप कायम आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी शेतकरी दिनेश हरमलकर हे आपल्या गाय व म्हैशीला चारण्यासाठी काजू बागेत नेले होते. दुपारी त्यांना आणण्यासाठी गेले असता म्हैस निदर्शनास आली नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली तरी म्हैस न मिळाल्याने त्यांची चिंता बळावली. न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस-केणीवाडा, कोंडुरा, दांडेली परिसरात हरमलकर कुटुंबीयांनी शोधाशोध केली. परंतु म्हैस न सापडल्याने ते हतबल झाले. अखेर पाच दिवसांनी भोमवाडी जवळील एका ओेहळात म्हैस विद्रुप मृत अवस्थेत पाण्यात तरंगताना दिलसी. याची कल्पना वनविभागास दिल्यानंतर वनविभागीचे कर्मचारी श्री.धुरी यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.
न्हावेलीत मगरींचा वाढता वावर त्रासदायक ठरत आहे.याठिकाणी असंख्य मगरी असल्याने ओहळ व नदीलगत शेतकऱ्यांना वावरणे देखील धोकादायक बनले आहे. मगरींच्या हल्ल्यांमुळे अनेक जनावरांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहेत. मगरींचा कायस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. आम्हाला केवळ नुकसान भरपाई नको तर पहिल्यांदा मगरींचा बंदोबस्त करा अशी मागणीही उपस्थित ग्रामस्थांनी केली.दरम्यान, वनविभागाचे श्री.धुरी, न्हावेली उपसरपंच प्रेमलता मसूरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष दादा हरमलकर, म्हैस मालक दिनेश हरमलकर व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला.मात्र, नुकसानीचा नेमका आकडा समजला नाही