शहरातील परमिट रुममधून पाच लाखाहून अधिक किंमतीच्या दारूची चोरी…

2

 

मालवण, ता. २४ : शहरातील बाजारपेठेतील पारकर परमिट रूम मधील पाच लाखाहून अधिक किंमतीची दारूची विक्री झाल्याचे दाखवून त्याची चोरी करून ती अन्य परमिट रूम, हॉटेल व्यावसायिकाला विकल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आला. त्यामुळे दारूच्या चोरीप्रकरणी परमिट रूमचे मालक विवेक पारकर यांनी संबंधित कामगाराच्या विरोधात मालवण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देत चौकशीची मागणी केली आहे.
बाजारपेठेतील पारकर परमिट रूम मध्ये स्टॉक सांभाळण्याचे काम करणाऱ्या एका कामगाराने दारूची विक्री झाली नसतानाही ती झाल्याचे दाखवत त्या दारूची चोरी केली. ती दारू शहरातीलच अन्य परमिट रूम, हॉटेल व्यावसायिकाला विकल्याचा संशय परमिट रुमचे मालक पारकर यांनी व्यक्त करत पोलिस ठाण्यात त्या कामगाराच्या विरोधात तक्रार अर्ज देत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. परमिट रुममधील स्टॉकची तपासणी केल्यावर झालेली विक्री व स्टॉक यात तफावत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजवरून दारूची चोरी झाली असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित कामगाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

4