प्रमोद जठार;सावंतवाडीचे नगराध्यक्षपद द्या,शंभर कोटीचा निधी देवू…
सावंतवाडी ता.२५: मला मते द्या अन्यथा नारायण राणे निवडून येतील,असे सांगून मते मागण्याचा धंदा दीपक केसरकरांनी बंद करावा.हा सर्व प्रकार म्हणजे लांडगा आला रे आला असे म्हणण्यासारखे आहे.दहशतवादाचा बागुलबुवा आता चालणार नाही.असा इशारा या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला.आमच्या हातात सावंतवाडीचे नगराध्यक्षपद द्या,येत्या काळात १०० कोटी रुपयांचा निधी आपण सावंतवाडीच्या विकासासाठी देऊ,असा शब्दही यावेळीश्री.जठार यांनी दिला.
गेल्या तीन वर्षात शहरातील अनेक प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनिर्णित राहिले,असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्री जठार यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मनोज नाईक, महेश सारंग,महेश धुरी, दादू कविटकर, बबलू सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.जठार पुढे म्हणाले,सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनता भाजपाचे उमेदवार संजू परब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत निश्चितच माझ्या उमेदवाराला यश मिळेल,असा विश्वास आहे.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या रोजच्या आश्वासनाला आणि दहशतवादाच्या बागुलबुवाला लोक कंटाळले आहेत.त्यामुळे त्यांना आता या ठिकाणी यश येणार नाही.
विधानसभा निवडणुकीत केसरकरांना प्रेमापोटी येथील लोकांनी निवडून दिले होते.परंतु आता मात्र ते प्रेम संपले आहे.याठिकाणी सावंतवाडी शहराची निवडणूक असल्यामुळे आरोग्य,पाणी,वीज अशा सुविधा लोकांना हब्या आहेत.अनेक ठिकाणी डासांची समस्या आहे.पाणी येत नाही,अशा समस्या आहेत. त्यामुळे केवळ घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांना आता लोक स्वीकारणार नाहीत, असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे येत्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निश्चितच आमचा विजय होईल,असा विश्वास श्री.जठार यांनी व्यक्त केला.