बाबी जोगी ; परवाना, इन्शुरन्स संपलेल्या बोटमालकांना मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार…
मालवण, ता. १४ : क्यार वादळासह समुद्रात सातत्याने निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यानुसार आज जिल्ह्यातील २ हजार मच्छीविक्रेते तर ९७ बोट मालकांच्या खात्यात २ कोटी ६ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली असल्याची माहिती मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी दिली.
दरम्यान कोरोनाच्या काळात परवाना व इन्शुरन्स संपलेल्या बोट मालकांनाही आर्थिक मदत व्हावी यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदारांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे श्री. जोगी यांनी सांगितले.
क्यारसह सातत्याने आलेल्या वादळसदृश परिस्थितीत मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या मच्छीमारांना शासनाने मत्स्यपॅकेज द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. कोरोनाच्या काळात ही मदत मच्छीमारांच्या खात्यात जमा होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र सहायक मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने संबंधित मच्छीमारांच्या खात्यात मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे. यात दोन दिवसांपूर्वी १९५० रापण सदस्यांच्या खात्यात दीड कोटी रुपये जमा करण्यात आले. आज जिल्ह्यातील २ हजार मच्छीविक्रेते तर ९७ बोट मालकांच्या खात्यात २ कोटी ६ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यात ज्या बोटमालकांचा परवाना, इन्शुरन्स कोरोना काळात संपला त्या संबंधितांनाही ही आर्थिक मदत मिळावी यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री. जोगी यांनी सांगितले.