प्रमोद जठार; कोरगावकरांनी परबांवर टीका करण्यापेक्षा पतीचे धंदे तपासावेत…
सावंतवाडी ता.२६: “मी” नारायण राणेंना अंगावर घेवून आमदार झालो,दीपक केसरकरांसारखा लोंटागण घालून नाही.त्यामुळे केसरकरांनी नैतिकतेच्या गोष्टी सांगू नये,असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे लगावला.पाच पक्ष फिरून आल्याची टीका संजू परब यांच्यावर करणाऱ्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपल्या पतीचे काय धंदे आहेत हे तपासून पहावे.यावर मी अधिक बोलू इच्छित नाही,असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.जठार यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी राजन तेली,मनोज नाईक,सुजन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.जठार म्हणाले मी नारायण राणे यांना अंगावर घेवून आमदार झालो.त्यांच्या पाया पडलो ते ज्येष्ठ असल्यामुळेच,मात्र केसरकरांसारखा आमदारकीसाठी मी नारायण राणे ,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि ठाकरे यांच्या पाया पडलो नाही.ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे त्यांनी मला नैतीकतेच्या गोष्टी सांगू नये,यापुढे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर आपला राजीनामा द्यावा,पुन्हा निवडून यावे अन्यथा ते आमच्या मतावर निवडून आले आहेत.त्यामुळे त्यांची पिसे आम्ही रोज काढणारच,असेही त्यांनी सांगितले.यापुढचा खासदार मी स्वतःही असू शकतो.या ठिकाणी मी तब्बल चार लाख कोटी रुपयांचा प्रकल्प आणला होता.तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला होता.परंतु येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनासारखा प्रकल्प पुन्हा जावा यासाठी आंदोलन केले .त्यामुळे येथील बेरोजगारांचा शाप त्यांना लागेल.