वनिता कुलकर्णी; गुन्ह्यामध्ये घट होण्यास होणार फायदा
ओरोस ता.२६:
महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने अनेक प्रकारचे चांगले कायदे केलेले आहेत. या कायद्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचणे गरजेजे आहे. तसेच कायद्यामध्ये असलेल्या शिक्षेच्या तरतुदी लोकांपर्यंच पोहचल्या तरच महिलांविषयीच्या गुन्ह्यांमध्ये घट होण्यास मदत होणार असल्याचे मत जिल्हा महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक वनिता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी येथील पत्रकार कक्षामध्ये ‘महिला सुरक्षा’ विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनिता कुलकर्णी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य बाळ खडपकर, जिल्हा पत्रकार संघाच्या सहसचिव देवयानी वरसकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण, मुख्यालय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, पत्रकार विनोद दळवी, दत्तप्रसाद वालावलकर, मनोज वारंग, लवू म्हाडेश्वर, संजय वालावलकर, रवि गावडे, तेजस्वी काळसेकर, सतीश हरमलकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये प्रथम तक्रार दाखल करणे गरजेचे असल्याचे सांगून वनिता कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेले कायदे हे कठोर आहेत. त्यामधील शिक्षेच्या तरतुदीही चांगल्या आहेत. पण, या कायद्यांविषयी महिलांमध्ये जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. अनेक वेळा महिला या तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यांनी न घाबरता तक्रार दिली पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. ते बजावण्यासाठी मुळात गुन्हा दाखल होणे गरजेचे असते. त्यासाठी महिलांनी अशा गुन्ह्यांमधील संबंधितांविरोधात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जागृत असावे. पारंपारीक गुन्ह्यांसोबतच सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक तसेच समाज माध्यमांच्या द्वारे महिलांविषयी अनेक गुन्हे घडत आहेत. याविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी, माध्यम प्रतिनिधींनी याविषयी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना अश्लिल मॅसेज पाठविणे, विडंबन केलेली छायाचित्र अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे सध्या समाजामध्ये घडत आहेत. त्यांचा उलगडाही पोलीस शिताफीने करत आहेत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यास त्याची तक्रार पोलीसांकडे दाखल करावी असे आवाहन श्रीमती कुलकर्णी यांनी यावेळी केले.