विद्यार्थ्यांचा गळा आवळणारी कडावल शाळेतील शिक्षिका निलंबित…

2

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई; कोकण विभागीय स्तरावर होणार चौकशी…

ओरोस ता २६:
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कडावल शाळेतील दोन मुलांचा गळा आवळणे प्रकरणातील शिक्षिकेला अखेर गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. शारदा तुकाराम चव्हाण असे त्या शिक्षिकेचे नाव असून आता तिची कोकण विभागीय स्तरावरून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 मधील शिक्षिकेने दोन मुलांचा गळा दाबल्याचा आरोप करीत त्याचा जाब ग्रामस्थ विचारत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यात पालक, ग्रामस्थ विरुद्ध ती शिक्षिका यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसत होते. हा प्रकार जिल्हा प्रशासनाने गंभीर घेतला होता. त्यामुळे त्या शिक्षिकेवर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनीही या शिक्षिकेला निलंबित करण्याचे आदेश दिले होते. अखेर गुरुवारी मंजूलक्ष्मी यांनी त्या शिक्षिकेला निलंबित केले
याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांना विचारले असता, 20 डिसेंबर रोजी शिक्षिका शारदा चव्हाण यांच्याकडून मुलांचा गळा दाबण्याचा प्रकार घडला होता. 21 डिसेंबर रोजी याचा जाब शाळेत जावून शिक्षिकेला विचारला होता. त्यावेळी त्यांच्यात खडाजंगी झाली. 23 डिसेंबर रोजी कुडाळ गटशिक्षणाधिकारी यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. त्याच दिवशी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यासमोर याची साक्ष झाली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर, चौकशी अधिकारी, त्या शाळेचे मुख्याध्यापक, त्यावेळी शाळेत हजर असणारे शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर गुरुवारी 26 डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूलक्ष्मी यांनी शारदा चव्हाण यांना निलंबित केले आहे. निलंबित कालावधीत त्यांना वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता निलंबित शारदा चव्हाण यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबोकर यांनी दिली.

4