सिंधुदुर्गातील शासकीय निमशासकीय व पालिका लिपिकांची २९ रोजी बैठक…

2

ओरोस ता.२७:
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व नगर पालिकांमध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकांची बैठक 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. ओरोस रवळनाथ मंदिर जवळ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था सभागृहात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी ‘कनिष्ठ लिपिकांना सुधारित वेतनश्रेणी’ मिळण्याबाबत उहापोह केला जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ लिपिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कनिष्ठ लिपिक सत्यवान कदम, राजेंद्र कदम यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात, कनिष्ठ लिपिक सुधारित वेतनश्रेणी पासून वंचित राहिले आहेत. तिसऱ्या व चौथ्या वेतन आयोगात कनिष्ठ लिपिक पदाबरोबर वेतन घेणारे अन्य कर्मचारी संवर्ग पाचव्या ते सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाल्यानंतर 20 पटीने पुढे गेले आहेत. राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी गेल्या 40 वर्षात अनेक आंदोलने केली. परंतु कनिष्ठ लिपिकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सुटलेला नाही. गेल्या 30 वर्षात शासनाने अनेक पदे तयार केली. हे कर्मचारी मान्यताप्राप्त संघटना स्थापन करून विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. त्यांना न्याय मिळाला. पण संस्थान कालीन कारकुन असलेला कनिष्ठ एक संघ होवू शकलेला नाही.
राज्य शासनाने वर्ग 4 च्या कर्मचाऱ्याला लिपिक पदासाठी आरक्षण दिलेले आहे. अशा पदोन्नतीने लिपिक पदांवर आलेल्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या लाभानंतर 1900 रूपये ग्रेड पे होते. त्याचवेळी 40 वर्षे काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिकावर अन्याय केला जातो. याचाच अर्थ कनिष्ठ लिपिक पदाच्या वेतनश्रेणीत त्रुटि आहेत. त्या दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व नगर परिषदेत कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे महसुल, कोषागार, न्यायालय, आरोग्य, वनीकरण, बांधकाम, लघु पाट बंधारे, खारभूमी, सेवा योजना, समाज कल्याण, नगर पालिका, जिल्हा परिषद अशा विविध विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकांनी ‘एकी हेच बळ’ मानून 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्यवान कदम, राजेंद्र कदम यांनी केले आहे.

4