ओरोस ता.२७:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित जिल्हास्तरीय बाल-कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०१९-२० मध्ये वैयक्तिक व सांघिक अशा विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये जिल्ह्यातील १५०४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ ३० जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता येथील डॉन बॉस्को स्कुलच्या मैदानावर होणार आहे. या प्रसंगी पडवे जिप शाळा नं १ चे विद्यार्थी मानवंदना देणार आहेत तर वेंगुर्ला जिप शाळा नं ४ चे विद्यार्थी स्वागत गीत सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे नृत्य आणि संगीत प्रकारात पारदर्शकता आणण्यासाठी यावर्षी पासून शिक्षकांना व्यासपीठावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा जिल्हास्तरीय बाल-कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०१९-२० हा ३०, ३१ डिसेंबर २०१९ आणि १ जानेवारी २०२० या कालावधीत ओरोस येथील डॉन बॉस्को स्कुलच्या भव्य मैदानावर संपन होणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ ३० डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक अशा विविध प्रकारच्या १२ क्रीडा प्रकारांचा समावेश असून यात प्रत्येक तालुक्यातून ९२ विद्यार्थी (लहान गट) व ९२ विद्यार्थी (मोठा गट) असे एकूण १८८ विद्यार्थ्यांचा समावेश असून आठही तालुक्यातील १५०४ विद्यार्थि सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्याचा बहुमान पडवे जिप शाळा नं १ च्या विद्यार्थ्यांना देण्यात आला असून यावेळी स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी ही सहभागी होणार आहेत. तसेच स्वागत गीत नृत्य वेंगुर्ला जिप शाळा नं ४ चे विद्यार्थी सादर करणार आहेत. यावर्षी उत्कृष्ट तबला आणि हार्मोनियम वादक विद्यार्थ्यांचा बक्षीस देवून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विजेत्या व उपविजेत्या स्पर्धक आणि संघांना मेडल, शील्ड देण्यात येणार असल्याची माहिती श्री आंबोकर यांनी यावेळी दिली.
या होणार स्पर्धा
लहान गटात १ ली ते ५ वी च्या (११ वर्षे वयोगट) मुला-मुलींचा समावेश असणार असून प्रत्येक तालुक्यातील ९२ विद्यार्थी ५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, ५० मी × ४ रिले, उंच उडी, लांब उडी, कबड्डी, खो खो, लंगडी, ज्ञानी मी होणार, समूहगान स्पर्धा व समुहनृत्य स्पर्धेत भाग घेणार आहेत. तर मोठ्या गटात ६ वी ते ८ वी च्या (११ ते १४ वयोगट) मुला-मुलींचा समावेश असणार आहे. ते १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, १०० मी × ४ रिले, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, कबड्डी, खो खो, लंगडी, ज्ञानी मी होणार, समूहगान स्पर्धा व समुहनृत्य स्पर्धेत भाग घेणार आहेत.