मनसेची मागणी;प्रताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन
सावंतवाडी, ता. 28 : येथील कारागृहातील कैदी राजेश गावकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारागृह अधीक्षकांची चौकशी करण्यात यावी,तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी तालुका मनसेच्या वतीने प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांच्याजवळ करण्यात आली.दरम्यान २६ जानेवारी पर्यंत कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा उपस्थितांकडून देण्यात आला आहे.याबाबत त्यांनी श्री.खांडेकर यांना निवेदन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे,शहराध्यक्ष आशिष सुभेदार,एसटी परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, युवती शहराध्यक्ष ललिता नाईक आदी उपस्थित होते.
राजेश गावकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर येताच कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.याप्रकरणा नंतर कारागृह अधीक्षकांचा असलेला मनमानी कारभार समोर आला आहे.दरम्यान संबंधित कैद्याला अमानुष मारहाण झाली असून त्यातूनच त्याचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त होत आहे.दरम्यान संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.तसेच या प्रकरणात घडलेल्या सर्व दोषींवर कारवाई व्हावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राजेश गावकर यांच्या मृत्यूस कारागृह प्रशासन कारणीभूत ठरले असून त्याचा मृत्यू प्राथमिक अहवालात गंभीर ईजा होऊन झाल्याचे समोर आले आहे.या घटनांमुळे कारागृहाचा कारभार वादात सापडला आहे.
कैदी गावकर याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते व त्यांना ज्यावेळी कारागृहाच्या बाहेर खोलीतून बाहेर काढले त्या ठिकाणी त्यावेळच सी सी टी व्ही फुटेज तपासावेत व या तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.तसेच या प्रकरणाची मानवी हक्क आयोगामार्फत चौकशी करण्यासाठी अहवाल पाठविण्यात यावा.तसेच कारागृह अधीक्षकांच्या मनमानी कारभाराची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी व कारागृह अधीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात यावा.याबाबत पंधरा दिवसानंतर २६ जानेवारीला आपल्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कारागृह अधिकार्यांविरोधात निदर्शने केली जातील.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार राहील असे श्री.गवंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.