राणेंच्या आजूबाजूला असलेलेच “गुन्हेगार”…

2

रूपेश राऊळ;माजी मुख्यमंत्र्यांना टिका करणे शोभत नाही…

सावंतवाडी ता.२८: नारायण राणे यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला माझ्यावर टीका करणे शोभत नाही,मी जे आंदोलन केले ते लोकांच्या भल्यासाठी आहे.मात्र माझ्यावर टीका करणाऱ्या राणेंच्याच आजूबाजूला अनेक गुन्ह्यातील गुन्हेगार फिरताना दिसत आहेत,अशी टीका शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली.दरम्यान कालच्या आंदोलनाबाबत माझ्यावर आरोप करणाऱ्या डंपर चालक-मालक संघटनेच्या अध्यक्षांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा श्री.राऊळ यांनी दिला.येथील शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री राऊळ पुढे म्हणाले कालचे डंपर आंदोलन हे प्रकरण माझ्या पंचायत समिती मतदारसंघातील आहे त्यामुळे तेथील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे माझे कर्तव्य आहे आणि ते पार पाडत असताना माझ्यावर किती आरोप झाले तरी मी मागे हटणार नाही मी एक शिवसैनिक आहे माझ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे संस्कार आहेत त्यामुळे कोणीही आमच्यावर खंडणीचे आरोप करू नयेत आणि आणि काल तहसीलदार कार्यालय झालेल्या बैठकीदरम्यान डंपर चालक-मालक संघटनेच्या अध्यक्षांनी माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत त्यांनी माझी माफी मागावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले,कळणे मायनिंग संदर्भात गेले अनेक दिवस आमची आंदोलने सुरू आहेत.या खनिज वाहतुकीमुळे वेत्ये, मळगाव ,निरवडे न्हावेली,मळेवाड या ठिकाणचे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या वाहतुकीमुळे घरांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे.तर ही वाहतूक बाजारपेठे मधून होत असल्यामुळे याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसत आहे.याबाबत ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने सुरू करावी यासाठी मळगाव बाजारपेठेतील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. दरम्यान या सर्व मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांच्या समक्ष या विषयावर तोडगा काढण्यासाठी २६ डिसेंबर रोजी मायनिंग अधिकारी ,डंपर व्यवसायिक व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.मात्र मायनिंग कंपनीचे अधिकारी याठिकाणी नसल्याचे कारण सांगून ते परदेशात असल्यामुळे तात्काळ याठिकाणी येऊ शकत नाहीत ,असे तहसीलदारांकडून सांगण्यात आले होते.व औपचारिक रित्या ही बैठक घेण्यात आली होती.त्यानंतर २७ डिसेंबरला आम्ही डंपर रोको आंदोलन छेडू असा इशारा देत तहसीलदारांना निवेदन दिले होते.त्यानंतर २७ डिसेंबरला ही वाहतूक मळगाव येथे रोखण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी करत आम्ही तात्काळ मायनिंग च्या अधिकाऱ्यांना बोलून तसिलदारांच्या समक्ष तुमची बैठक घेतो, असे आश्वासन दिले होते.त्यानंतर तहसीलदार कार्यालयात मायनिंग संबंधी अधिकाऱ्यांना तात्काळ बोलविण्यात आले मात्र परदेशात असलेले मायनिंग चे अधिकारी आज अचानक कसे काय दाखल झाले ?असा सवाल आमच्याकडून यावेळी उपस्थित करण्यात आला,असे यावेळी बोलताना श्री.राऊळ यांनी सांगितले.

 

3

4