दीपक केसरकरांचा प्रतिप्रश्न;विकासासोबत कोणाही सोबत,पण चुकीच्या हातात सत्ता नको
*सावंतवाडी ता.२७:* निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपर्यंत अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या राणेंना अचानक साक्षात्कार कसा काय झाला ?,असा प्रश्न आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.मी विकासाला महत्त्व देणारा माणूस आहे.त्यामुळे माझी कोणासोबतही काम करण्याची तयारी आहे.मात्र चुकीच्या लोकांच्या हातात येथील पालिका जाऊ नये,यासाठी नागरिकांनी बाबू कुडतरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,असेही यावेळी श्री.केसरकर यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे यांनी विकासासाठी केसरकर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची आपली तयारी आहे,असे मत व्यक्त केले होते.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.केसरकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. “ते म्हणाले गेले आठ ते दहा दिवस नारायण राणे नीतेश राणे आदींनी आपल्यावर टोकाला जाऊन टीका केली,मग निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांना कसे काय सुचले,कोणता साक्षात्कार झाला ,की ते माझ्यासोबत काम करण्याची तयारी दाखवत आहेत.माझ्याविरोधात बोलल्यानंतर त्यांना मते मिळत नाहीत,हे लक्षात आल्यामुळे त्यांनी लोकांना भावनिक आवाहन केले.मात्र त्यांच्या या आवाहनाला तेथील जनता बळी पडणार नाही.काही झाले तरी लोकांनी उद्या होणार्या मतदान प्रक्रियेत बिनधास्त सहभाग घ्यावा व कुडतरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.