बेकायदा दारुसह ७ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

2

आरवली – वेंगुर्ले येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बांदा.ता,२८
वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून वेंगुर्ले येथे करण्यात आलेल्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सायंकाळी कारवाई केली. आरवली टांक येथील बागकर स्टॉपनजीक ही कारवाई करण्यात आली. बेकायदा दारु वाहतुकीत एकूण ४ संशयित सामील होते. मात्र दोघेजण कारवाई दरम्यान फरार झाले. अखेर वाहन चालक श्रीधर शंकर मोर्ये (२५, सुंदर भाटले, वेंगुर्ले) व भगवान शशिकांत गावडे (४९, रा. गावडेवाडी, वेंगुर्ले) यांना बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी अटक करण्यात आली. एकूण २ लाख ६८ हजार ८०० रुपयांची दारू, ५ लाख रुपयांची स्विफ्ट कार व १२ हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ७ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणार्‍या बेकायदा दारु वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेंगुर्ले येथे दारु वाहतुक होणार असल्याची माहिती इन्सुली उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरवली टांक येथील बागकर स्टॉपनजीक सापळा रचण्यात आला होता. गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एमएच-०४-जीई-८२१६) तपासणीसाठी थांबविण्यात आली. कारची तपासणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला.
दारु कारवाई सुरु असताना दोन संशयित फरार होण्यात यशस्वी झाले. कार चालक श्रीधर मोर्ये व साथीदार भगवान गावडे यांना दारु वाहतुक प्रकरणी अटक करण्यात आली. कारवाईत एकूण २ लाख ६८ हजार ८०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. ५ लाख रुपयांची कार व दोन मोबाईल असा एकूण ७ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने केली.

1

4