भुईबावडा विद्यालयातील १९९० च्या दहावी बॕचच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘स्नेहसंमेलन’…
वैभववाडी.ता,२९: भुईबावडा येथील आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयातील सन १९९० च्या दहावी बॕचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मुंबई येथील शिरोडकर हायस्कूल परेल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल २९ वर्षांनी मित्र मैत्रीणी भेटल्यामुळे एकमेकांच्या सुख दुःखाबाबत चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरूवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. आपण ज्या गावामध्ये ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतले त्यानंतर नोकरी व्यवसाय करत आहोत. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असावा. ज्या मातीमध्ये आपले बालपण गेले. त्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे. असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.
तब्बल २९ वर्षांनी एकत्र आलेल्या मित्र मैत्रीणीनींनी गप्पा गोष्टी करीत जुने किस्से, जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाचा रुणानुबंध आजही आपल्या शाळेशी तितकाच जोडलेला आहे. म्हणूनच ज्या शाळेने आपल्याला घडविले त्या शाळेला गुरूदक्षिणा म्हणून पुढील काळात लागणारी मदत करण्यात येईल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अनंताच्या प्रवासाला असणारे कै. भिकू भस्मे, संजय चाळके, अशोक पवार या माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे इन्स्पेक्टर माजी शिक्षक श्री. मालूसरे, श्री. दुकाने, श्री. केसरे यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जगदीश पोतदार, महेश चव्हाण, प्रमोद देसाई, आशा मोरे-शिंदे, विजय जाधव, मनिषा पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद देसाई यांनी केले तर आभार महेश चव्हाण यांनी मानले.