गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही…
मालवण, ता. २९ : भारतात यापूर्वी मी पाच वेळा आलो. मात्र माझे आजोबा, वडील राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग यावेळी पहिल्यांदाच आला. गावात आल्याचा मोठा आनंद आहे. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे याचाही आनंद आहे. आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत असे आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी वराड या आपल्या मूळ गावी सांगितले.
खासगी दौऱ्यावर आलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे आज सकाळी तालुक्यातील वराड या मूळ गावी दाखल झाले. याबाबतची कोणतीही माहिती शासकीय यंत्रणेस नव्हती. सकाळी वराड या गावी ‘वरदश्री’ या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबीयांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान वराडकर यांनी गाडीतून उतरताच भारतीय पद्धतीने उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी गावकऱ्यांनीही मालवणी बोली भाषेत त्यांचा जयघोष करत स्वागत केले. सुहासिनींनी पंचारती ओवळल्या. पंतप्रधान गावात आल्याची माहिती गावात सर्वत्र पसरताच सर्वच लोकांनी त्यांना गराडा घातल्याचे दिसून आले.
डॉ. लिओ यांच्या सोबत त्यांचे वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले व संपूर्ण कुटुंबीय गावी दाखल झाले आहेत. डॉ. लिओ वराडकर यांनी मालवणी जेवणाचा आस्वाद लुटला. त्यानंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावातील वेताळ मंदिर, कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. वराड येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी दुभाषिक म्हणून काम पाहिले.
यावेळी वसंत वराडकर, शेखर वराडकर, अविनाश वराडकर, पांडुरंग वराडकर, अरुण गावडे, हरिश्चंद्र परब, पोलिस पाटील संतोष जामसंडेकर, पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, नगरसेवक यतीन खोत, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यासह ग्रामस्थांनी पंतप्रधान डॉ. वराडकर यांचे स्वागत केले.
प्रत्येकजण पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्यासोबत सेल्फी व फोटो काढण्यात मग्न होते. यावेळी कोणताही मोठेपणा न ठेवता वराडकर सर्वसामान्यात मिसळत असल्याचे पहावयास मिळाले. यातून त्यांची सर्वसामान्य माणसाबद्दल असलेली आपुलकी दिसून आली. भारतात गेल्या २५ वर्षात येथील विकासाने प्रगती केल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशात अधिक चांगले संबंध प्रस्थापित होण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
देवाच्या प्रार्थनेत मोठी शक्ती
२०१७ साली मी आयर्लंड देशाचा पंतप्रधान झालो. यावेळी वराड गावात ग्रामस्थांनी माझ्यासाठी देवालयात प्रार्थना केली. मी धार्मिक नाही मात्र मला कल्पना आहे, की प्रार्थनेत मोठी शक्ती असते. असे सांगत पंतप्रधान लीओ वराडकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.