नितेश राणे; अखेर छोटा राणेचं केसरकारांना भारी पडला…
सावंतवाडी ता.३०: “चांदोबा” माहित नाही,पण “संजूबाबा” मात्र सावंतवाडीकरांना मिळाला.अखेर छोटा राणेच केसरकरांना भारी पडला,असा टोला आमदार नितेश राणे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही सर्वाच्या सहकार्यांच्या मदतीने शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करू,आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण येथेच संपले आहे.राणेंच्या फायली उघडून विकास होणार नाही,असाही चिमटा श्री.केसरकर यांचे नाव न घेता श्री.राणे यांनी काढला.संजू परब यांचा नगराध्यक्षपदी विजय झाल्यानंतर येथील नगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे गेले अनेक वर्षे सावंतवाडी ताब्यात घेण्याचे स्वप्न आहे.तो त्यांचा बालहट्ट आहे.परंतु सावंतवाडीचा चांदोबा त्यांना मिळणार नाही,अशी टीका केली होती.याबाबत बोलताना श्री.राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी सुदन बांदिवडेकर,राजन तेली,नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब, सभापती मानसी धुरी, माजी सभापती पंकज पेडणेकर सुधीर आडिवरेकर,परीमल नाईक, दिलीप भालेकर,दिपाली भालेकर,समृद्धी विरनोडकर, सुधीर आडिवरेकर,संदीप नेमळेकर,प्रमोद गावडे,प्रमोद सावंत,आनंद नेवगी,मनोज नाईक, मोहिनी मडगावकर,चित्रा भिसे,परिणीता वर्तक आदी उपस्थित होते.
श्री राणे पुढे म्हणाले, संजू परब यांचा विजय हे येथील सर्व भाजप कार्यकर्त्यांचे यश आहे. त्यामुळे येथील जनतेला दाखवलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या श्री.परब यांना प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी मेहनत घेणे गरजेचे आहे.आणि असे न झाल्यास प्रसंगी मी त्यांचे कान पकडून ही विकास कामे करून घेईन असा विश्वासही श्री राणे यांनी यावेळी दिला.
ते पुढे म्हणाले ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढविली आहे.येथील अपूर्ण प्रकल्प त्याचबरोबर सावंतवाडी करांना मनोरंजनाची साधने आम्ही आता उपलब्ध करून देणार आहोत.येत्या एक मे रोजी आम्ही याठिकाणी कंटेनर थेटर सुरू करण्याची घोषणा पूर्ण करणार आहोत.यावेळी सर्व सावंतवाडीकर सह चित्रपट बघण्याची संधी आम्हाला मिळणार आहे.असेही त्यांनी सांगितले
संजू परब यांचा विजय म्हणजे मी माझा मोठा भाऊ खासदार नितेश राणे यांना दिलेले नवीन वर्षाचे गिफ्ट आहे.आणि ते त्यांना नक्कीच आवडेल श्री.परब यांनी प्रामाणिक राहून नेहमीच राणे कुटुंबीयांची साथ दिली. त्यामुळे हे यश ते सहज मिळू शकले असे मतही त्यांनी व्यक्त करत श्री परब यांचे अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचा विस्तार होत असताना तळ कोकणातील जनतेने भाजपाला स्वीकारले आहे.महाविकास आघाडीची सत्ता म्हणजे चोरून केलेली मंत्रिमंडळाची स्थापना आहे.मात्र येथील जनतेला भाजपाची विकास कामे माहित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी याठिकाणी निवडणुकांमध्ये भाजपाला चांगला प्रतिसाद दिला आहे.