संजू परब;केसरकरांचा पालिकेशी संबंध नाही,आता आम्ही ठरविणार…
सावंतवाडी ता.०१:शहरातील नागरिकांना २४ तास पाणी आणि ड्रेनेजची चांगली व्यवस्था हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण सावंतवाडी पालिकेत कार्यरत राहणार आहे,असा शब्द सावंतवाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान दीपक केसरकर हे आमदार आहेत.त्यांचा सावंतवाडी पालिकेशी काही संबंध नाही.त्यामुळे विकासकामाबाबत काय निर्णय घ्यावा,हे आम्ही ठरवणारआहोत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी गटनेते राजू बेग, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, समृद्धी विरनोडकर,दीपाली भालेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. परब म्हणाले,आपण दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार घेतला.आता अनेक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी शहराचा विकास करायचा आहे.या पार्श्वभूमीवर शहरात बंद असलेले हेल्थ फार्म, स्विमिंग पूल यासारखे प्रकल्प येत्या ३ महिन्यात सुरू करण्याचा आमचा मानस आहे.तसेच सावंतवाडी शहरातील लोकांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.त्याचबरोबर ड्रेनेज सिस्टीम नव्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य सारखे प्रश्न सुटणार आहे .आपण नवखा असलो तरी गेली सतरा वर्षे आपल्याला सामाजिक कामाचा अनुभव आहे.त्यामुळे निश्चितच आपण सावंतवाडी पालिकेत काम करत असताना यशस्वी होईल,असा विश्वास श्री परब यांनी व्यक्त केला.