तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
वेंगुर्ले.ता,०१:
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने ‘सुदृढ भारत अभियान’ अंतर्गत आयोजित वेंगुर्ला व सावंतवाडी तालुका स्तरीय सुदृढ गाव रस्सीखेच स्पर्धेत अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात वेताळ जयहनुमान तुळस संघाने तळवडे म्हाळाईदेवी प्रासादिक संघास पराभूत करत विजेतेपदाचा मानकरी ठरला,तर म्हाळाईदेवी प्रासादिक संघ तळवडेला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर शालेय गटात जनता विद्यालय तळवडे यांनी बाजी मारत विजेत्या पदाचा मान मिळविला. श्री शिवाजी हायस्कुल तुळस उपविजेते ठरले.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने जैतिर मंदिर तुळस मैदान येथे वेंगुर्ला व सावंतवाडी द्वितालुकास्तरीय शालेय व खुल्या पुरुष रस्सीखेच स्पर्धेचे उदघाटन वेंगुर्ला पोलीस ठाणेच्या उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गोरड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तुळस सरपंच शंकर घारे, सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष व माजी प.स. सभापती जयप्रकाश चमणकर, उपसरपंच जयवंत तुळसकर, जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव,राष्ट्रीय रस्सीखेचपटू किशोर सोनसुरकर, पोलीस नितीन चोडनकर, देवस्थानचे मानकरी अनिल परब, प्रतिष्ठांनचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर, ग्रा. सदस्या शितल नाईक, नाना राऊळ, अजय नाईक, वनरक्षक सावळा कांबळे, महेश राऊळ, मंगेश सावंत, सद्गुरु सावंत आदी मान्यवर उपस्थित हॊते. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उपनिरीक्षक गोरड यांनी क्रीडा क्षेत्रात ग्रामीण युवकांना प्रोत्साहान देण्याचा वेताळ प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत कौतुक केले व अशा क्रीडा स्पर्धातून भविष्यातील खेळाडू घडत असल्याने सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे असे आवाहन केले. तर स्पर्धेच्या समारोप प्रसंगी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी उपस्थित होते. संघाच्या खिलाडूंवृत्ती व कौशल्यपूर्ण सादरीकरणाने प्रभावित होत जिल्हा रस्सीखेच संघ निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन करत येथील दर्जेदार खेळाडूंची प्राधान्याने निवड करण्यात येईल असे सांगितले. स्पर्धा दरम्यान किशोर सोनसुरकर यांनी सरपंच तर हेमंत गावडे, भूषण मसुरकर, हेमंत नाईक,मनोहर कावले यांनी पंच म्हणून काम पाहिले. समालोचन अजय नाईक व वसंत घारे यांनी केले.