‘घुंगुरकाठी’ ट्रस्टचे आडाळीत ८ जानेवारीला उद्घाटन…

140
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पर्यावरण मित्र दिलीप कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती…

दोडामार्ग, ता.०२ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व विशेषत: दोडामार्ग तालुक्याच्या सामाजिक, ग्रामविकास व पर्यावरण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावण्याच्या हेतुने स्थापन झालेल्या ’घुंगुरकाठी’ या अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे (एनजीओ ट्रस्ट) उद्घाटन बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी या गावात होत आहे. पर्यावरण मित्र व ‘गतिमान संतुलन’ मासिकाचे संपादक दिलीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध लेखक व पर्यावरण पत्रकार संतोष शिंत्रे, श्रीमती पौर्णिमा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष व संस्थापक मुख्य विश्वस्त सतीश लळीत यांनी आज येथे दिली.
या उपक्रमाबाबत श्री. लळीत यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्री. लळीत म्हणाले की, पत्रकारितेनंतर महाराष्ट्र शासनात ‘लोकराज्य’ संपादक, मुख्यमंत्री यांचा मुख्य जनसंपर्क अधिकारी अशा अनेक महत्वाच्या पदांवर काम करुन मी अलिकडेच निवृत्त झालो. निवृत्तीनंतर मुंबई –पुण्यात स्थायिक न होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक होण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला व सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचे ठरविले. त्यानुसार या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेची नोंदणी सहायक धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग यांच्याकडे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० नुसार धर्मादाय विश्वस्त निधी म्हणून केली आहे.
संस्थेच्या उदि्दष्टांबाबत माहिती देताना ते म्हणाले की, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘रयतेचे राज्य’या संकल्पनेनुसार आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’या संदेशानुसार ग्रामीण भागातील सर्व स्तरातील, सर्व जातीधर्माच्या सर्वसामान्य नागरिकांच्या उत्थानासाठी कार्य करणे, नागरिकांचा सर्वांगीण विकास करुन त्यांचे जीवनमान उंचावणे, विविध शासकीय यंत्रणांच्या मदतीने पायाभूत सुविधांची उभारणी करणे, जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण, निसर्ग संरक्षण, पश्चिम घाटातील जैवविविधता जपणे व तिच्याबाबत जनजागृती करणे, पर्यावरण विनाशक प्रकल्पांबाबत जनजागृती करणे, मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य व स्वच्छताविषयक जनजागृती, पर्यटन विकास, लोककलांचे संवर्धन, मालवणी बोलीचे जतन, पुरातत्व स्थळांचे संशोधन व संरक्षण अशा प्राधान्याने ही संस्था कार्य करेल. नीतिन विलास सांड्ये (सावंतवाडी), गौरीश विकास काजरेकर (मालवण) आणि सचिन रामचंद्र माजगावकर (माजगाव) यांची विश्वस्त म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे.
या संस्थेचे नाव ‘घुंगुरकाठी’असे ठेवण्यामागची भूमिका स्पष्ट करताना श्री. लळीत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘संरक्षक देवतां’ची संकल्पना आहे. या संरक्षक देवता रात्रीच्यावेळी संचार करुन गावाचे रक्षण करतात, वाईट हेतुने फिरणाऱ्यांना पिटाळून लावतात. चुकल्यामाकल्यांना मदत करतात, अशी जनतेची श्रद्धा असते. या देवतांच्या हातात एक काठी असते, तिला घुंगुर लावलेले लावलेले असतात. तिला ‘घुंगुरकाठी’ असे म्हणतात. रात्रीच्यावेळी या काठीचा आणि घुंगुरांचा आवाज येतो. पण काठी किंवा देवता दिसत नाही, अशी ही श्रद्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यप्राणीसंपदा, पर्यावरण, सह्याद्री (पश्चिम घाट) मधील विपुल जैवविविधता, सांस्कृतिक व सामाजिक पर्यावरण धोक्यात आले आहे. या सर्वांचे रक्षण ही आज तातडीची गरज झाली आहे. या संस्थेला हेच कार्य अभिप्रेत असल्याने संस्थेचे नाव ‘घुंगुरकाठी’ असे ठेवण्यात आले आहे.
संस्थेने आडाळी येथे ‘घुंगुरकाठी भवन’ ही छोटीशी सुविधायुक्त वास्तू उभारली आहे. या वास्तुचे लोकार्पण श्री. कुलकर्णी यांच्याहस्ते होईल. वास्तुचे लोकार्पण, संस्थेचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा असा हा कार्यक्रम आडाळी चर्चजवळ ‘लळीत बंधुंची मठी’ या ठिकाणी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळात होणार आहे. यावेळी लेखक व पर्यावरण पत्रकार संतोष ‍शिंत्रे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिक, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. लळीत यांनी केले.
०००००

\