मालवण, ता. २ : रेझिंग डे च्या पार्श्वभूमीवर आज मालवण पोलिसांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना पोलिस ठाण्याकडे मांडल्यास त्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
येथील पोलिस ठाण्याच्यावतीने रेझिंग डे निमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात आज पहिल्या दिवशी सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, प्रसाद आचरेकर, देवेंद्र लुडबे या पोलिस कर्मचार्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. सुभाष दिघे, बाळकृष्ण माणगावकर यांची भेट घेत संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, सूचना असल्यास त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यास त्यांचा प्राधान्याने विचार करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. रेझिंग डे च्या निमित्ताने मार्गदर्शन कार्यक्रम तसेच कणकवली, सावंतवाडी विभागात क्रिकेट स्पर्धा यासह अन्य उपक्रम येत्या काही दिवसात राबविण्यात येणार आहेत अशी माहिती पोलिस ठाण्याच्यावतीने देण्यात आली.