वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन : ७५ सायकलपटुंनी घेतला सहभाग
वेंगुर्ले.ता.२:
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने ‘सुदृढ भारत अभियानांतर्गत’ ‘फिट इंडिया’ मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आयोजित ३० किलोमीटर सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणावर ऱ्हास होत आहे. दैनंदिन जीवनात इंधनावर चालणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांचा यांचा कमी अंतराच्या प्रवासासाठी सुद्धा बेसुमार वापर आणि व्यायामाकडे चाललेले दुर्लक्ष याविषयी जनजागृती व्हावी, इंधन भावीपिढीकडे सुपूर्द व्हावे या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान च्या वतीने सयक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे उदघाटन कुडाळ येथील ज्येष्ठ सायकलपटू शेख चाचा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर, नाना राऊळ, सचिव गुरुदास तिरोडकर, मंगेश सावंत, सद्गुरु सावंत, ऍड प्रभानंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
वैयक्तिक निरोगी आरोग्य, इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धन आणि सायकल वापराचे फायदे असा संदेश देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात तुळस, होडवडा, तळवडे, मळगाव पासून पुन्हा तुळस असे तीस किलोमीटर अंतर पार करत सुमारे पंच्याहत्तर पेक्षा जास्त व्यक्तींनी सायकल मॅरेथॉनमध्ये सहभाग दर्शविला. या सायकल मॅरेथॉनमध्ये लहान मुलांनी तीस किलोमीटर अंतर पार करत एक फिट इंडिया चा संदेश देण्याचा प्रयत्न केला. सर्व सहभागी सायकल पटूना प्रतिष्ठानच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैतिराश्रीत संस्था मुंबई चे अध्यक्ष ऍड प्रभानंद सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना वेताळ प्रतिष्ठान नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत आहे. रक्तदान, आरोग्यशिबिर, नेत्र तपासणी शिबीर अशा आरोग्यविषयक उपक्रमासोबत यावर्षी फिट इंडिया संदेश देणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन म्हणजे अनमोल सामाजिक योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव सावंत तर आभार केशव सावंत यांनी मानले. प्रतिष्ठानने केलेले आयोजन आणि ग्रामीण भागात घेतलेला सयक्लोथॉन उपक्रमाबाबत सर्व सायकलपटूंनी प्रतिष्ठानचे कौतुक केले. या सायकल मॅरेथॉन उपक्रमात वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, मालवण तालुक्यातून अनेक सायकलपटू सहभागी झाले होते.