आमदार नीतेश राणे:राज्य सरकार द्वेषभावनेने काम करतेय
कणकवली, ता.०२: कणकवली, देवगडसारखा विकास सावंतवाडीकरांना हवाय. त्यासाठीच त्यांनी आमच्या हाती शहराची सत्ता दिली आहे आणि आम्ही सावंतवाडीचा विकास करूनच दाखवू अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी आज कणकवली पर्यटन महोत्सवात दिली. तसेच राज्य सरकार द्वेषाने, सूडबुद्धीने काम करतेय. सिंधुदुर्गासह कोकणातील सर्वच विकासकामांना खो घालण्याचे काम केलं जातंय. पण हे उध्वस्त सरकार चार दिवसांचे पाहुणे आहे. त्यांनी कितीही विरोध केला तरी सिंधुदुर्गचा विकास आम्ही करून दाखवू अशीही ग्वाही श्री.राणे यांनी दिली.
श्री.राणे म्हणाले, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात सिंधु महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन महोत्सवाला प्रारंभ केला. त्याच प्रेरणेने आम्ही कणकवलीत देखील पर्यटन महोत्सव सुरू केला. गतवर्षीच्या पर्यटन महोत्सवात तब्बल 6 कोटींची उलाढाल झाली होती. सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर अशा महोत्सवांतून व्यापार, उदीम देखील वाढत आहे. कणकवली शहरात लवकरच कंटेनर मत्स्यालय सुरू करत आहोत अशीही ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील उद्धव नव्हे तर उध्वस्थ सरकारमधील नवीन नगरविकास मंत्री कणकवली शहरातील रस्त्यांची कामे थांबविण्यासाठी मुख्याधिकार्यांना फोन करतात. सर्व नवीन कामांच्या टेंडरना स्थगिती दिली जातेय. एकूण द्वेषाचेच राजकारण सध्या सुरू आहे. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंचे संरक्षण कमी केलेय. विरोधी पक्षनेत्यांचे शासकीय घर देखील काढून घेण्यात आले आहे असे श्री.राणे म्हणाले.