जाधव,सावंत,गोवेकर यांना संधी;लवकरच होणार पुरस्कार वितरण…
दोडामार्ग.ता,०४: तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.यात ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार शंकर जाधव ,उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार प्रथमेश सावंत यांना तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार पवन गोवेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.लवकरच दिमाखदार सोहळ्यात पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या यावर्षीच्या पुरस्कार निवडीसंदर्भात येथील वन विश्रामगृहावर समितीचे अध्यक्ष प्रभाकर धुरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार,उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार आणि उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली.
त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार शंकर मधुकर जाधव यांना,उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार प्रथमेश सावंत यांना जाहीर करण्यात आला.गेली अनेक वर्षे तालुक्यातील वृत्तपत्रांना छायाचित्र मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करणारे फोटोग्राफर विजय शेटये यांना गतवर्षी उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार दिला होता.त्याच धर्तीवर यावर्षी पत्रकारांना सहकार्य करणाऱ्या पवन गोवेकर यांना सन २०१९-२० चा उत्कृष्ट फोटोग्राफर पुरस्कार जाहीर करण्यात आला.या बैठकीला तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रभाकर धुरी,उपाध्यक्ष तेजस देसाई,सचिव शंकर जाधव,सहसचिव संदेश देसाई,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास देसाई,तालुका पत्रकार समितीचे सदस्य ऋषीकेश धर्णे,महेश लोंढे,गणपत डांगी, गजानन बोंद्रे,समीर ठाकूर,प्रथमेश सावंत आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना ओळखपत्र देणे,वार्षिक वर्गणी जमा करणे,पत्रकार सहायता निधी संकलित करणे, पत्रकार दिन साजरा करणे.आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.बैठक खेळीमेळीत झाली .