जिल्हा परिषद सभापती निवडी १४ रोजी…

93
2
Google search engine
Google search engine

ओरोस ता.०४:
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद सभापतपदाच्या निवडणुका जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी जाहिर केली असून 14 जानेवारी रोजी दु 3 वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची खास सभा आयोजित करण्यात आली आहे. समाज कल्याण, महिला व बाल कल्याण, वित्त व बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य अशा चार पदांसाठी ही निवडणूक होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड 30 डिसेंबर रोजी झाल्यानंतर सभापती निवडणूक होणार की नाही ? याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अध्यक्ष पदी समिधा नाईक, उपाध्यक्षपदी राजेंद्र म्हापसेकर यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता सभापती निवडीकडे लक्ष लागून राहिला आहे. यासाठी 14 जानेवारी रोजी निवडणूक जाहिर झाली असून सकाळी 11 ते दु 1 या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर दु 3 वा खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपकडे 31 सदस्य आहेत. तर शिवसेनेकडे 16 व कॉंग्रेसकडे 3 सदस्य आहेत. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप 31 विरुद्ध कॉंग्रेस-शिवसेना 19 असा आकडा राहिला होता. तोच आकडा सभापती निवडीवेळी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे सभापती बसणार, हे निश्चित. मात्र, या चार विषय समिती सभापती पदांवर कोणाची वर्णी लागते ? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.