Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यालाच स्वीकारल्या प्रकरणी मत्स्य आयुक्तासह दोघे जाळ्यात...

लाच स्वीकारल्या प्रकरणी मत्स्य आयुक्तासह दोघे जाळ्यात…

लाच लुचपतची कारवाई ; दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले…

मालवण, ता. ०४ : पर्ससीन ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका व्यावसायिकाकडे पाच लाखाची लाच मागून त्यातील दोन लाख रुपये स्वीकारताना मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सायंकाळी पाच वाजता रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करून उद्या जिल्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे मत्स्यव्यवसाय विभागात खळबळ उडाली आहे.
काल रात्री मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने समुद्रात गस्त घालत असताना एका स्थानिक मच्छीमारांचा पर्ससीननेटचा ट्रॉलर पकडण्यात आला. हा ट्रॉलर जप्त करण्यात येईल अशी भीती घालत या ट्रॉलरबरोबर अन्य एका ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांनी केली. ही रक्कम दिल्यास मे महिन्यापर्यत तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही या अधिकार्‍यांनी सांगितले. ही रक्कम तीन टप्प्यात द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी संबंधित मच्छीमाराने मान्य केली.
याबाबतची तक्रार त्या मच्छीमार व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. आज सायंकाळी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयात सायंकाळी पाच वाजता संबंधित मच्छीमार व्यावसायिक पहिल्या हफ्त्यातील दोन लाख रुपयांची लाच देण्यास गेला असता ही रक्कम स्विकारताना सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने धाड टाकत रंगेहाथ पकडले. या कारवाईत लाचलुचपत पोलिस उपअधीक्षक दीपक कांबळे, पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोलिस हवालदार प्रथमेश पोतनीस, जनार्दन रेवंडकर, पोलिस नाईक अजित खंडे, रवींद्र पालकर हे सहभागी होते. उद्या या दोन्ही संशयित आरोपींना जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments