पाडलोस मध्ये आढळले वाघाच्या पायाचे ठसे….

2

परिसरात भितीचे वातावरण;गवा रेड्याच्या मुक्तसंचारानंतर दुसरे संकट…

बांदा.ता,०५:
पाडलोस परिसरात गवा रेड्यांच्या भीतीच्या छायेत असलेल्या ग्रामस्थांना केणीवाडा येथील आंब्याचागाऊळ येथील शेतात पाण्याच्या ठिकाणी वाघाच्या पावलांचे ठसे आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केणीवाडा येथील शेतकरी अमित नाईक हे आपल्या गुरांना चारण्यासाठी आज सकाळी आंब्याचागाऊळ येथील शेतात घेऊन गेले होते. त्यावेळी पाण्याच्या ठिकाणी बांधावर त्यांना दोन दोन फुट अंतरावर वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसले. त्यांनी याची माहिती स्थानिकांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी पाहिले असता हे ठसे वाघाचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे पाडलोस परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काजू पीक काढणीचा हंगाम सुरू होणार असून वायंगणी शेती भागात वाघ किंवा बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे. मडुरा, पाडलोस, आरोस, सातार्डा, साटेली, आजगाव परिसरात पाळीव जनावरांवर रानटी प्राण्यांनी हल्ले करून जनावरांची शिकार झाल्याचे प्रकार घडले आहेत. पाडलोस, मडुरा मध्ये तर उपद्रवी प्राण्यांमुळे शेकडो जमीन पडिक ठेवण्यात आली आहे. त्यात अशा हिंस्त्रप्राण्यांची भर पडल्यास आम्हाला शेती बागायतीत जाणेच धोकादाक बनणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, वनविभागाशी संपर्क साधला असता आम्ही घटनास्थळी येऊन सदर पावलांची पाहणी केल्यानंतर ते ठसे कुठच्या प्राण्याचे आहेत ते सांगतो, असे ग्रामस्थांना सांगण्यात आले.
चौकट:-
केणीवाडा येथील शेतात सुमारे दोन फुटांच्या अंतरावर वाघाच्या पावलांचे ठसे आहेत. हा वाघ अंदाजे चार ते पाच वर्षांचा असावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पायाची चार बोटे स्पष्ट दिसत असून चार ठिकाणी ठसे लागलेले आहेत.

4