पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं ध्येय ठेवा…

173
2
Google search engine
Google search engine

माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांचे देवरूख येथे प्रतिपादन

वैभववाडी.ता,०५:  आपल्याला यश मिळावे, यासाठी आपले पालक रात्रीचा दिवस करत काबाडकष्ट करत असतात. आपल्याला यश मिळाले, तर त्यांना सर्वाधिक समाधान मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे ध्येय ठेवले पाहिजे. असे प्रतिपादन माईंड ट्रेनर व मोटिव्हेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ यांनी व्यक्त केले.
देवरूख कॉलेज आॅफ आर्ट अँड डिझाईन येथे माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांचा विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने पांचाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य रणजित मराठे, प्राध्यापक परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले ध्येय ठरविताना विचार फार महत्त्वाचे असून जसा विचार कराल, त्यानुसार आपल्याला यश मिळेल. सकारात्मक विचार यशाच्या शक्यता वाढतात, तर नकारात्मक विचार आपल्याला यशापासून दूर नेतात, अंतर्मन म्हणजे आपल्याला मिळालेले वरदान आहे. त्याचा योग्य वापर केल्यास यश सहज मिळू शकेल. असे पांचाळ म्हणाले.
मोबाईल वापरताना त्याचा यशासाठी वापर कसा करता येईल, तेवढा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने करायला हवा. यशासाठी वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे असते. ते करण्यासाठी आपल्या गुरूजनांचा आधार घ्यायला हवा. असेही सदाशिव पांचाळ यावेळी म्हणाले. सुमारे दोन तास पांचाळ यांनी मार्गदर्शन केले.
सदाशिव पांचाळ यांच्या सुचनांचा विद्यार्थ्यांनी वापर करून यशाचा मार्ग सुकर करावा. असे आवाहन या प्रसंगी प्राचार्य रणजित मराठे यांनी केले. प्राचार्य रणजित मराठे यांच्या हस्ते सदाशिव पांचाळ यांचा शाल व श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला.
पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य मराठे यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्राध्यापक परांजपे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक पोटफोडे यांनी केले. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.