दांडी समुद्रातील घटना ; मृत पर्यटक साकीनाका मुंबईतील…
मालवण, ता. ०५ : पॅरासिलिंगला गेलेल्या अझर मनझर अन्सारी वय ३५ रा. मोहली व्हिलेज साकीनाका मुंबई या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे तीन वाजता दांडी समुद्रात घडली. त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
साकी नाका मुंबई येथील अन्सारी दांपत्य आज दांडी येथील समुद्रकिनारी वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटण्यास गेले होते. यात अझर अन्सारी हा पॅरासिलिंग करण्यास एका स्पीड बोटीवर गेले होते. यात पॅरासिलिंग करताना बोट चालकाने स्पीड वाढविला. याच दरम्यान बोटीवर सेल्फी काढत असलेल्या अझर याचा तोल गेल्याने तो बोटीवर आपटून समुद्रात पडला अशी माहिती मिळत आहे. हा प्रकार लक्षात येताच पर्यटन व्यावसायिकांनी त्याला तत्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय परिसरात व्यावसायिकांनी गर्दी केली होती. या प्रकाराची माहिती मिळताच बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर अन्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत.
गेल्या महिनाभरातील ही पाचवी दुर्घटना आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.