लाच स्वीकारल्याप्रकरणी मत्स्य अधिकारी वस्त याच्यासह एकाला ७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी…

204
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओरोस ता.०५:
समुद्रात अवैधरीत्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीननेट ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका मश्चिमार व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीमती एस एस घोडके यांनी 7 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांनी काम पाहिले.
शनिवारी सायं. 5 वाजता मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. यामुळे मत्स्यव्यवसाय विभागात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी रात्री मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने समुद्रात गस्त घालत असताना एका स्थानिक मच्छीमाराचा पर्ससीननेटचा ट्रॉलर पकडण्यात आला होता. हा ट्रॉलर जप्त करण्यात येईल, अशी भीती घालत या ट्रॉलरबरोबर अन्य एका ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांनी केली. ही रक्कम दिल्यास मे महिन्यापर्यत तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही या अधिकार्‍यांनी सांगितले. ही रक्कम तीन टप्प्यात द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी संबंधित मच्छीमाराने मान्य केली.
याबाबतची तक्रार त्या मच्छीमार व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचत शनिवारी सायंकाळी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयात संबंधित मच्छीमार व्यावसायिक पहिल्या हप्त्यातील दोन लाख रुपयांची लाच देण्यास गेला असता ही रक्कम स्विकारताना सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने धाड टाकत रंगेहाथ पकडले. या कारवाईत लाचलुचपत पोलिस उपअधीक्षक दीपक कांबळे, पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोलिस हवालदार प्रथमेश पोतनीस, जनार्दन रेवंडकर, पोलिस नाईक अजित खंडे, रवींद्र पालकर हे सहभागी होते. मत्स्य व्यवसाय विभागात झालेल्या या कारवाईमुळे मत्स्यव्यवसाय खात्यात खळबळ उडाली आहे. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त हे किनारपट्टीवरील तिन्ही तालुक्यांचा कारभार पाहतात. त्यांच्यावर तसेच नव्यानेच भरती झालेल्या परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोन अधिकार्‍यांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाल्याने मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, रविवारी या दोन्ही संशयिताना जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीमती एस एस घोडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोघांनाही 7 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

\