डी.के. सावंत; मुंबई येथील एल्गार परिषद दिला इशारा…
मुंबई. ता,०५: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून संबंधित रेल्वे प्रशासन त्यांची दखलही घेत नाही.ह्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर १ मे रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे आजच्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या एल्गार परीषदेत निश्चित करण्यात आले.
मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींची दादरच्या सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल मध्ये रेल्वे गाड्या खेड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे थांबविण्यासाठी, डहाणू – सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी, सकाळी दादर- रत्नागिरी व रात्री दादर- सावंतवाडी, पुणे – सावंतवाडी गाड्या चालु करण्यासाठी तसेच गेली कित्येक वर्षे खोळंबलेल्या अन्य मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या एल्गार परिषदेस सावंतवाडी पासून डहाणू पर्यंत विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.डी.के सावंत यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडून आलेल्या नकार पत्रांचा समाचार घेताना कोकण रेल्वेचे अधिकारी करत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी नितीन गांधी, सुनील उतेकर, अभिमन्यू लोंढे, भाई देउलकर, अमोल सावंत, विनोद रेडकर, शांताराम नाईक, संतोष पाटणे, प्रशांत परब, एस् बी राणे, धनंजय शिंदे, रमेश सावंत इत्यादी विविध प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी कोकण रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मार्गदर्शन केले. रेल्वे प्रशासनाला धडा शिकविण्यासाठी रेल्वे रोको आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले. तत्पुर्वी प्रशासनाला इशारा देण्यासाठी २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे मुख्यालय बेलापूर नवी मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्याचे निश्चित करण्यात आले.