जिल्हा बँकेला शिवसेनेचा राजकीय अड्डा बनवू नका…

213
2

राजन तेली;नेत्यांच्या बॅनरचा खर्च स्वतःच्या खिशातून करा, बँकेतून नको

कणकवली, ता.०६:  सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्वसामान्य नागरिकांची आहे. सहकारात काम करणार्‍या सर्वांना या बँकेबाबत आपुलकी आहे. या बँकेला शिवसेनेचा राजकीय अड्डा बनवू नका. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचे फ्लेक्स, बॅनरचा खर्च स्वतःच्या खिशातून करा, जिल्हा बँकेचा पैसा त्यासाठी वापरू नका असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी आज येथे केले.
येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह परशुराम झगडे, राजश्री धुमाळे, गीतांजली कामत आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री.तेली म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक जवळ येत तसे आपल्या मर्जीतील संस्था संचालक व इतर कार्यकर्ते जिल्हा बँकेत आणले जात आहेत. त्यांच्या वारंवार बैठका होत आहेत. एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी काही ठराविक संस्थांचे चेअरमन घेऊन जिल्हा बँक अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत. याखेरीज जिल्हा बँकेचे काही ठराविक संचालक तसेच काही सोसायट्यांचे संचालक यांना घेऊन जिल्हा बँकेचे अध्यक्ष पिकनिकला जाणार आहेत. जर पिकनिकला न्यायचे असेल तर जिल्ह्यातील सर्व 234 सोसायट्यांच्या संचालकांना घेऊन जा. जिल्हा बँकेत भेदभावाचे राजकारण करू नका असे श्री.तेली म्हणाले.
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ सर्वच शेतकर्‍यांना झाला होता. तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही प्रोत्साहनपर 25 हजाराचे अनुदान मिळाले होते. पण ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीचा फायदा सर्वसामान्य शेतकरी आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही झाला नसल्याची टीका श्री.तेली यांनी केली.

4