विवेक रेडकर; जनसेवा निधीचा पुरस्कार सोहळा संपन्न…
बांदा ता.०६: विद्यार्थ्यांची प्रगती गुणपत्रिकेतील टक्क्यांवर मोजू नका. अभ्यासात कमी असलेला विद्यार्थी तंत्रज्ञान व अंगी असलेल्या काैशल्यामुळे मोठ्या क्षेत्रात करिअर करु शकतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासाबरोबर व्यवसायिक शिक्षणाचे धडे देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मालवण येथील हृदयरोगतज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी येथे केले.
येथील जनसेवा निधी या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा जि. प. केंद्रशाळा बांदा नं. १ च्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉ. विवेक रेडकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे पुरस्कार वितरणाचे हे ३२ वे वर्ष होते.
यावर्षीचा आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कार निरवडे नं. १ शाळेच्या दर्शना शिरसाट, आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार माध्यमिक विद्यालय नेरुरच्या अनंत सामंत, आदर्श समाजसेवक पुरस्कार धामापूर येथील सचिन देसाई, गुरुवर्य व्ही. एन. नाबर समिती बांदा पुरस्कृत आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक पुरस्कार आदर्श विद्यामंदिर सावडाव – कणकवलीचे रविंद्र सावंत यांना प्रदान करण्यात आला. तसेच दहावी परीक्षेत इंग्रजी व मराठी विषयात प्रथम अमोल अर्जुन गावडे तसेच बारावीत प्रथम ऐश्वर्या दिपक पेंडसे यांना गौरविण्यात आले.
यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातून मिळणारे शिक्षण प्रत्यक्ष जीवनात उपयुक्त नसल्याचे मान्य केले. कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जनसेवा निधी संस्थेचे डॉ. मिलिंद खानोलकर, जि. प. सदस्या श्वेता कोरगांवकर, मंगेश कामत, बंड्या नार्वेकर, हेमंत खानोलकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, जे. डी. पाटील, डॉ. अरविंद खानोलकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, सुधीर शिरसाट, डी. जी. सडेकर, सुहासिनी सडेकर, शंकर नार्वेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गाैरवी पेडणेकर, प्रास्ताविक गुरुनाथ नार्वेकर तर आभार अरुण देसाई यांनी मानले.