रात्री थंडीच्या कडाक्यात हरिनामाच्या भजनात ग्रामस्थ मग्न
वैभववाडी/पंकज मोरे.ता.०७
वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावच्या बहुचर्चित गावपळणीला शनिवारपासून सुरूवात झाली. सुमारे ४५० वर्षांची परंपरा ग्रामस्थ आजही तेवढ्याच श्रध्देने पार पाडत आहेत. गावपळणी दरम्यान तीन दिवस गाव सुना- सुना असतो. येथील प्राथमिक शाळा आंब्याच्या वृक्षाखाली भरविली जात आहे. या गावपळणीत ग्रामस्थांसह आबालवृध्द ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये हरिनामाचा जप करीत निसर्गाचा आनंद लुटत आहेत.
सोमवारी गावपळणीच्या तिसऱ्या दिवशी प्राथमिक शाळाही या वस्तीनजिक झाडाखाली भरली. त्यामुळे येथील मुलांना व शिक्षकांनाही वर्षातून किमान पाच दिवस बिन भिंतीची शाळा अनुभवता येते. शिराळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंत शाळा आहे. येथे वीजेची सोय नसल्यामुळे इतर उपकरणे नसल्याने विरंगुळा म्हणून येथील मुले क्रिकेट, हॉलीबॉल, पाण्यात पोहणे आदी विविध खेळ खेळतात.
या गावपळणीमध्ये चिमुरड्यांसह आबालवृध्द सहभागी आहेत. रात्री ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये ही गावपळण पौष महिन्यामध्ये होते. रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून ही मंडळी एकत्र येवून गप्पा गोष्टी मारत भजने करतात. दिवसभर पुरुष जनावरे सांभाळणे, तर महिला दैनंदिन घरातील कामे उरकतात.
गावपळणी दरम्यान तीन दिवस कोणीही गावात जात नाहीत. चौथ्या दिवशी देवाचा कौल घेतला जातो. जर देवाने हुकूम दिला तर पाचव्या दिवशी गावभरण होते. पाचव्या दिवशी नाही दिला तर सातव्या दिवशी गाव गजबजतो. या गावपळणीमध्ये चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. जिल्ह्यात एकमेव दरवर्षी गावपळण होणारे गाव म्हणून शिराळे गावाची ओळख आहे.