सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने “रेझिंग डे” चे आयोजन…

2

ओरोस ता.०७:  २  ते ८ या कालावधीत जिल्हा पोलिस दलाच्यावतीने रेझिंग डे चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवारी जिल्हा पोलिस क्रीडा मैदानावर जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व मुख्यालय पत्रकार संघ यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. आठ षटकांच्या रंगलेल्या टेबल टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात मुख्यालय पत्रकार संघाने 6 धावांनी विजय संपादन केला. मुख्यालय पत्रकार संघाचे गिरीश परब सामनावीराचे मानकरी ठरले. उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश काकडे यांच्याहस्ते मुख्यालय पत्रकार संघाला चषक देवून गौरविण्यात आले.
नानेफेक जिंकत पोलिस अधिकारी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आठ षटकात मुख्यालय संघाने 4 गडी गमावत 80 धावा केल्या. मुख्यालय संघाच्या गिरीश परब यांनी 29 चेंडूत 9 चौकार मारित नाबाद 57 धावा केल्या. त्यांना प्रशांत सावंत यांनी 11 चेंडूत 10 धावा करीत चांगली साथ दिली. पोलिस अधिकारी संघाच्यावतीने पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पहिलेच षटक टाकत एक गडी मिळविला. त्यानंतर त्यांनी सात षटके यष्टिरक्षकची भूमिका उत्तमप्रकारे निभावली. सहाय्यक पोलिस निरीक्षक ओटवणेकर यांनी 2 षटकात 27 धावा देत महत्वपूर्ण 2 गडी मिळविले. सहाय्यक पोलिस निरीक्षक केराम, अमोल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांनी चांगली गोलंदाजी केली. मुख्यालयाचा पहिला गडी 3 धावा असताना बाद झाला. त्यानंतर गिरीश व प्रशांत सावंत यांच्यात 49 धावांची भागीदारी झाली. याच धावसंख्येवर तीसरा गडी बाद झाला. चौथा गडी 59 धावावर बाद झाला.
81 धावांचे उद्दिष्ट घेवून मैदानात उतरलेल्या पोलिस अधिकारी संघाने आठ षटकात 4 गडी गमावत 74 धावा केल्या. सलामिला दस्तरखुद अधीक्षक गेडाम मैदानात उतरले होते. त्यांनी 4 धावा केल्या. पोलिस उपनिरीक्षक देसाई यांनी सर्वाधिक 9 चेंडूत 20 धावा केल्या. 10 चेंडूत 18 धावा करीत उपनिरीक्षक चव्हाण यांनी विजयासाठी प्रयत्न केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक केराम, ओटवणेकर, अमोल चव्हाण यांनीही विजयासाठी झुंज दिली. मात्र, त्यांचे प्रयत्न विजयासाठी यशस्वी ठरले. मुख्यालयाच्या उमेश परब यांनी दोन षटकात एक गड्याच्या मोबादल्यात 12 धावा देत पोलिसांच्या धावगतीला ब्रेक लावला. विनोद परब यांनी 21 धावात 1 गडी मिळविला. गिरीश परब व अरुण अणावकर यांनी प्रत्येकी 20 धावा दिल्या.
या निमंत्रित मैत्रीपूर्ण सामन्यापूर्वी सावंतवाडी व कणकवली विभागातील पोलिसांचा सामना झाला. यात सावंतवाडी संघाने विजय मिळविला. जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांनी सामन्यापूर्वी सर्व पत्रकारांचे स्वतः स्वागत केले. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे संदीप गावडे यांच्यासह बाळ खडपकर, नंदकुमार आयरे, संजय वालावलकर, विनोद दळवी, दिनेश गोसावी, लवु म्हाडेश्वर, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर, गुरुप्रसाद दळवी, राजेश पावसकर, ओमकार ढवण आदी पत्रकार उपस्थित होते. संदीप गावडे यांच्याहस्ते उपविजतेत्या पोलिस अधिकारी संघाला सन्मानीत करण्यात आले. तर विजेते पदाचा आकर्षक चषक उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश काकडे यांच्याहस्ते मुख्यालय पत्रकार संघाला देण्यात आला. सामनावीर ठरलेल्या गिरीश परब यांनाही आकर्षक भेटवस्तु देण्यात आली.

4