अनिल जाधव;बांदा पोलीस ठाण्यात पोलीस “रेझिंग डे” कार्यक्रमात प्रतिपादन…
बांदा. ता,०७: विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड झटकून आत्मविश्वासाने मार्गक्रमण करावे. पुस्तकी द्यानाबरोबरच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील असणे गरजेचे आहे. आपला शिक्षणाचा पाया भक्कम असल्यास आपण जीवनात यशस्वीपणे वाटचाल करू शकता. यासाठी शारीरिक व बौद्धिक मेहनत करा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी येथे केले.
बांदा पोलीस ठाणे येथे आयोजित ‘पोलीस रेझिंग डे’ कार्यक्रमात जाधव जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्याध्यापिका अनुराधा धामापूरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, पोलीस हवालदार उदय कामत, मनीष शिंदे आदी उपस्थित होते.
पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भारताचे नागरिक असल्याने या विद्यार्थ्यांना शस्त्रांची प्राथमिक माहिती मिळावी तसेच पोलिसांची कार्यपद्धती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या विविध शंकांचे निरसन जाधव यांनी केले. यावेळी कामत यांनी विद्यार्थ्यांना ३०३ रायफल, कार्बाईन मशीन, एसएलआर, एके ४७, एमएम ब्लॉक पिस्टल या शस्त्रांबाबत माहिती दिली. आभार मनीष शिंदे यांनी मानले.