- सतीश सावंत; तेलींनी जिल्हा बँकेला नाहक बदनाम करू नये…
कणकवली,ता.०७: महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील शेतकर्यांचे ३५ कोटींचे कर्ज माफ होत आहे. त्याचबरोबर नियमित कर्ज भरणार्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळावे यासाठीच संस्था चालकांची बैठक आम्ही घेतली होती. ही बैठक राजन तेलींना राजकीय अड्डा वाटत असेल तर त्याची पुनरावृत्ती कितीही वेळा करायला आम्ही तयार आहेत असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज केले. तसेच राजकीय हेवेदेव्यासाठी गोरगरिबांच्या, शेतकर्यांच्या जिल्हा बँकेला बदनाम करू नका असेही ते म्हणाले.
येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. श्री.सावंत म्हणाले, राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत कोकणासाठी वेगळे निकष लावले जावेत. तीन वर्षातील खावटी कर्जाची माफी मिळावी. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे आदी मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील संस्था चालकांची बैठक बोलावली होती. यात बैठकीला राजकीय अड्डा म्हणणे चुकीचे आहे. शेतकर्यांसाठी हिताचे निर्णय घेण्यासाठी बोलावलेली बैठक राजकीय अड्डा कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न श्री.सावंत यांनी केला. यापूर्वी भाजप सरकार असतानाही जिल्ह्यातील खावटी कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा फायदा झाला नव्हता. त्यावेळीही आम्ही संस्था चालकांची बैठक घेऊन त्याबाबतचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांना घेऊन खावटी कर्ज प्रश्नी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि सहकार मंत्र्यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी राजन तेली यांना जिल्हा बँक राजकीय अड्डा वाटली नाही. आता निवडणुका आल्यानंतर त्यांना संस्था चालकांच्या बैठका म्हणजे राजकीय अड्डा वाटू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकर्यांची आहे. त्यामुळे राजकारण आणून बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न राजन तेली यांनी करू नये असा इशाराही श्री.सावंत यांनी दिला.
शेतकर्यांची सहल स्थगित
जिल्ह्यातील शंभर टक्के कर्ज वसुली करणार्या संस्थांचे चेअरमन आणि सचिव यांची कृषी सहल नगर जिल्ह्यातील आष्टी आणि बारामती येथे काढण्यात आली होती. शेती क्षेत्रातील बदल पाहता यावेत तसेच बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहता यावेत यासाठी ही सहल होती. यात कोणताही राजकीय भेदभाव ठेवला नव्हता. मात्र या सहलीला राजकीय रंग दिल्याने शेतकरी दौरा कार्यक्रमाला स्थगिती देत असल्याचेही श्री.सावंत यांनी जाहीर केले.