शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आदर्श व्यक्तींमधील गुण आत्मसात करावेत : एम.के.गावडे

2

उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

वेंगुर्ला.ता.७: शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आदर्श व्यक्तींमधील गुण आत्मसात करून आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करावा. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मात्यापित्यांचे ऋण, गुरुजनांचे ऋण व समाजाचे ऋण कधीही वीसरु नये. शाळेत दिली जाणारी पारितोषिके ही शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मिळालेली कौतुकाची थाप असते. त्यामुळे शालेय जीवनातून महाविद्यालय तसेच पुढे जाऊन नोकरी धंदा, उद्योग करत असताना एकदा मागे वळून पाहून शाळेच्या सर्वांगीण विकासास हातभार लावावा व आपल्या मात्यापित्यांचे, गुरुजनांचे, शाळेचे त्याचबरोबर गावाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे चेअरमन एम.के.गावडे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ श्री. एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी गावडे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले न.प.च्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, काथ्या कारखान्याच्या संचालिका प्रज्ञा परब, संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कामत-आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, सचिव रमेश नरसुले, कार्यकारणी सदस्य राधाकृष्ण मांजरेकर, सुनील परब, खजिनदार सुजित चमणकर, गोविंद मांजरेकर, शाळेचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, स्वागतगीतांनी केली. त्यानंतर २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षात क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गावडे बोलताना म्हणाले की, उभादांडा सारख्या गावात या शाळेने गेली अनेक वर्षे शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात या शाळेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शाळेस भेडसावणाऱ्या समस्यांना आपण आपल्यातून होणारी मदत निश्चितच करण्याचा प्रयत्न करेन. विशेषतः या शाळेतील विद्यार्थीनीसाठी सुलभ, स्वच्छ शौचालयासठी काथ्या संचालिका प्रज्ञा परब व आपण तातडीने मदत करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी या शाळेने गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचे केलेले कौतुक अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार काढले. वीरेंद्र कामत आडारकर व रमेश पिंगुळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांनी केले तर स्वागत शिक्षक श्री गोवेकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री बोर्डेकर तर आभार शिक्षक वैभव खानोलकर यांनी मानले.

4